अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेच्या नगररचना विभागासह इतर विभागात आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी अचानक भेट देत झाडाझडती घेतली. यावेळी अनेक कर्मचारी जागेवर नसल्याने आयुक्तांनी त्यांना धारेवर धरत खडेबोल सुनावले. यावेळी नगररचनासह इतर विभागात अनेक फायली, रेकॉर्ड अस्ताव्यस्त आढळून आले. त्यावर डांगे यांनी सर्व रेकॉर्ड येत्या आठवडाभरात व्यवस्थित करत प्रलंबित फायली तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी प्रभारी अधिकार्यांना दिल्या.
नगररचना विभागाच्या कामकाजाबाबत व कर्मचार्यांची, अधिकार्यांची अनुपस्थिती, फायली, रेकॉर्ड न सापडणे, फायली प्रलंबित अशा तक्रारी आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयुक्त डांगे यांनी अचानक विभागात जाऊन तपासणी केली.
नगररचना विभागात स्वाती आहिरे यांच्याकडे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. ऑनलाईनप्रणालीवर त्यांचा आयडी तात्काळ तयार करावा व सहाय्यक संचालक स्नेहल यादव यांच्याकडे प्रलंबित असलेल्या फायली त्यांच्या आयडीवर ट्रान्सफर कराव्यात. सर्व प्रलंबित फायली नियमानुसार मंजूरी देऊन मार्गी लावाव्यात. ज्यात त्रुटी असतील, त्या पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात. येत्या दहा दिवसात सर्व फायली निकाली निघतील, अशा प्रकारे नियोजन करावे, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले. तसेच, विभागात असलेल्या सर्व प्रकारच्या फायली, रेकॉर्ड व्यवस्थित लावावेत. फायली न सापडल्यास संबंधित कर्मचार्यावर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल.
बीपीएमएस प्रणालीत येणार्या अडचणींबाबत शासनाच्या संबंधित अधिकार्याकडे माहिती देऊन त्या दूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा. नगररचना विभागासह इतर विभागातही आयुक्त डांगे यांनी अचानक भेट दिली. कार्यालयीन शिस्त पाळावी, कार्यालयीन वेळेत स्वतःच्या जागेवर थांबून वेळेत कामकाज करावे. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. विभागातील स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी. अस्वच्छता दिसल्यास संबंधित विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या शनिवारी, रविवारी व सोमवारी महानगरपालिकेचे कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळे कर्मचारी, अधिकार्यांनी सुट्टी न घेता वेळेत कार्यालयात उपस्थित रहावे, अशा सूचनाही आयुक्त डांगे यांनी दिल्या.