Wednesday, April 1, 2026
HomeनगरAMC : वाहतूक शिस्तीसाठी ‘पे अँड पार्क’ची अंमलबजावणी; मनपाची कठोर भूमिका

AMC : वाहतूक शिस्तीसाठी ‘पे अँड पार्क’ची अंमलबजावणी; मनपाची कठोर भूमिका

चुकीच्या पार्किंगवर दंडात्मक कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत 36 रस्ते व जागांवर ‘पे अँड पार्क’ सुविधा व त्याचे दर, नो पार्किंगच्या दंडाचे दर हे तत्कालीन महासभेने सभेत ठराव करून मंजूर केले आहे. त्यानुसार धोरणाची अंमलबजावणी झालेली आहे. ठेकेदार संस्थेच्या कर्मचार्‍यांकडून शुल्क वसुली सुरू करण्यात आली आहे. नो पार्किंग झोनमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक व जप्तची कारवाई होत आहे. कारवाईबाबत नागरिकांनी माहिती विचारल्यास कर्मचार्‍यांनी योग्य ती माहिती द्यावी, नागरिकांशी वर्तवणूक चांगली ठेवावी, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

शहरातील 36 रस्त्यांपैकी बहुतांशी रस्त्यांवर पे अँड पार्कनुसार पार्किंग शुल्काची वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी खासगी संस्थेने कर्मचारीही नियुक्त केले आहेत. प्रमुख चौकांमध्ये व रस्त्यांवर नो पार्किंग करण्यात आले आहे, त्या ठिकाणीही अंमलबजावणी व कारवाई सुरू करण्यात आली आहे. दंडाचे दर हे तत्कालीन महासभेत मंजूर करण्यात आले आहेत. नो पार्किंग, नो हॉकर्स झोनमध्ये पार्किंग केल्यास (जीएसटी अतिरिक्त) दुचाकी (टोविंग) 742 रूपये, दुचाकी (क्लँपिंग) 500 रुपये, चारचाकी (टोविंग) 984 रुपये, चारचाकी (क्लँपिंग) 742 रुपये असे दर निश्चित आहेत.

सध्या प्रशासन केवळ अंमलबजावणीच करत आहे. नागरिकांनी नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावू नयेत. रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करू नयेत, असे आवाहन करतानाच नियम न पाळण्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा डांगे यांनी दिला आहे. पे अँड पार्कच्या माध्यमातून वाहतुकीची, पार्किंगची समस्या मार्गी लागेल, वाहतुकीला शिस्त येईल व महानगरपालिकेलाही उत्पन्न मिळेल, असेही डांगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या