अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना व मलनिस्सारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच, शहराच्या उपनगर भागांसाठी नव्याने दुसर्या टप्प्यातील भुयारी गटार योजना राबविण्यात येणार आहे. त्याचा 617 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच हा आराखडा राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
केंद्र सरकारने मध्य शहरात भुयारी गटार योजना मंजूर केली होती. त्यात 57 एमएलडी क्षमतेचा मलनि:स्सारण प्रकल्प व ड्रेनेज लाईनची कामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्पाची चाचणी सुरू करण्यात आली आहे. ही चाचणी अंतिम टप्प्यात आली असून त्यानंतर हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर आता केडगाव, आगरकर मळा, कल्याण रस्ता, बोल्हेगाव, नागापूर, संपूर्ण सावेडी उपनगर, छत्रपती संभाजीनगर रस्ता परिसर, मुकुंदनगर, गोविंदपुरा परिसरात नवीन योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ड्रेनेज लाईन, तीन पंपिंग स्टेशनसह आणखी एक 18 एमएलडी क्षमतेचा मलनि:स्सारण प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मध्य शहर वगळता उर्वरित सर्व उपनगर परिसरात 672 किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्य शासनाकडे हा आराखडा तांत्रिक मान्यता घेण्यासाठी सादर होणार आहे.
मध्य शहराची पहिल्या टप्प्याची योजना कार्यान्वित झाल्यावर तेथील सांडपाणी व मैला नदी पात्रात टाकण्यात आलेल्या मुख्य ड्रेनेज लाईनद्वारे प्रकल्पात जाणार आहे. तसेच, नव्या प्रस्तावित उपनगर भागासाठीच्या योजनेतून सर्व उपनगरातील सांडपाणी व मैलाही याच मार्गाने प्रकल्पात जाईल. नवीन भुयारी गटार योजना झाल्यावर मैल्यामुळे सीनानदीचे होणारे प्रदूषण थांबणार असल्याचे डांगे यांनी सांगितले.