अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुळा धरणातून शहरासाठी घेतल्या जाणार्या बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीपोटी महापालिकेकडे 11 कोटी 63 लाख 71 हजार 836 रुपये थकबाकी आहे. थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटिसा बजावूनही थकबाकी न भरल्याने जलसंपदा विभागाने शुक्रवारपर्यंतची (14 मार्च) मुदत देऊन त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा महापालिकेला दिला आहे.
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी महापालिकेलाही नोटीस बजावली आहे. अपेक्षित वसुली होत नसल्याने अडचणीत असलेल्या महापालिकेच्या अडचणीत या नोटिशीमुळे आणखी भर पडली आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात अद्यापपर्यंत महापालिकेने 21 लाख 20 हजार 656 रुपये रक्कम पाणीपट्टीची जमा केली आहे. उर्वरित थकबाकी भरण्याबाबत महापालिकेला वारंवार लेखी सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांची महापालिकेने कोणतीही दखल घेतली नाही. थकबाकीची रक्कम वेळेत न भरल्यामुळे महापालिकेकडे अधिभाराची रक्कम वाढत आहे. महापालिकेकडे जानेवारीअखेर पाणीपट्टी 10 कोटी 24 लाख 68 हजार 283 रुपये, लोकल फंड 1 कोटी 2 लाख 65 हजार 175 रूपये, दंडनीय आकार 20 लाख 17 हजार 853 रुपये, तर अधिभार 16 लाख 20 हजार 523 रुपये अशी 11 कोटी 63 लाख 71 हजार 836 रुपये थकबाकी आहे.
जलसंपदा विभागाने येत्या 10 मार्चपर्यंत थकीत रक्कम भरण्यासाठी मुदत दिली होती. मात्र, आता 15 मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल व त्यामुळे उद्भवणार्या जनक्षोभास महापालिका जबाबदार राहील, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने फेब्रुवारी महिन्यातही महापालिकेला पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, अद्यापही महापालिकेने थकबाकी भरलेली नसल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.