अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या पाणीसाठ्यात 10 टक्के कपात करण्याचे आदेश दिले आहेत. याचा फटका अहिल्यानगर शहराच्या पाणीपुरवठ्याला बसणार असून, मुळा धरणातून दररोज उचलल्या जाणार्या पाण्यातून आता सुमारे एक कोटी लिटर पाण्याची कपात करावी लागणार आहे. त्यामुळे पाणी सोडण्याच्या वेळेत दहा मिनिटांपर्यंत कपात करण्याचा विचार महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे.
अहिल्यानगर शहरासाठी मुळा धरणात वार्षिक 1 हजार 400 एमसीएफटी (दशलक्ष घनफूट) पाणी राखीव आहे. यात 10 टक्के कपात होणार असल्याने 1 हजार 260 एमसीएफटी पाण्यात वर्षभराचे नियोजन करावे लागणार आहे. सध्या पाणीपुरवठा करण्यासाठी मुळा धरणातून महापालिका दररोज सुमारे 100 ते 105 एमएलडी म्हणजेच सुमारे दहा कोटी ते साडेदहा कोटी लिटर पाण्याचा उपसा करते. शासनाच्या 10 टक्के कपातीच्या निर्देशानुसार आता उपलब्ध साठ्यातून दररोज साधारणतः 10 एमएलडी म्हणजेच एक कोटी लिटर पाणी कमी उचलावे लागणार आहे. ही कपात मोठी असली तरी नागरिकांच्या सोयीसाठी सध्या सुरू असलेले एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत न करता पाण्याची बचत करण्याची प्रशासनाची भूमिका आहे.
त्यामुळे पाणी वितरणाच्या वेळेवर मर्यादा आणली जाणार आहेत. सध्या शहराच्या बहुतांश भागात सरासरी एक तास पाणीपुरवठा होतो. 10 टक्के पाण्याची कपात भरून काढण्यासाठी पाणी वितरणाच्या वेळेत पाच ते 10 मिनिटांपर्यंत कपात करावी लागेल. या काही मिनिटांच्या कपातीतूनच संपूर्ण शहराच्या एकत्रित नियोजनातून दररोजचे एक कोटी लिटर पाणी वाचविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. येत्या आठवडाभरात याबाबत निर्णय होऊन प्रत्यक्ष पाणी कपात सुरू होणार आहे.




