अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणार्या मुळानगर पाणी योजनेवरील उपसा पंप नादुरुस्त झाल्यामुळे शहरासह उपनगर भागात एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. मुळानगर पंपीग स्टेशन येथे 725 एचपीचे दोन पंप व 400 एचपीचे 2 पंप नियमित चालवून शहरास पाणी पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने धरणाची पातळी खालवली आहे. त्यामुळे 400 एचपीचा पर्यायी पंप चालवावा लागत आहे. हा पर्यायी पंप शुक्रवारी रात्री नादुरूस्त झाला आहे.
तसेच 725 एचपीचा पर्यायी पंपही दुरूस्ती चालू असल्याने बंद आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अतिरिक्त पंप उपलब्ध नसल्याने मुळानगर येथून होणारा पाण्याचा उपसा कमी झालेला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात एक दिवसाने उशिरा पाणीपुरवठा होणार आहे. शनिवार (दि. 10) बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, तसेच सारस नगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर भागास पाणी पुरवठा झालेला नाही. या भागात रविवारी (दि.11) पाणी पुरवठा होणार आहे. तर, रविवारी रोटेशन नुसार पाणी वाटप असलेल्या सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी या भागात सोमवारी (दि.12) पाणी सोडण्यात येणार आहे.
सोमवारी पाणी पुरवठा होऊ घातलेल्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टीव्ही सेंटर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर या भागात मंगळवारी (दि.13) पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.