युरोपातील माणसं पृथ्वीवरील त्यांना अपरिचित असणार्या भूखंडांवर समुद्रमार्गे पोहचली. याचा अर्थ त्यांना इतर जग आणि इतर जगाला युरोप ज्ञात नव्हता असे नव्हे. प्राचीन काळापासून युरोप आणि आशिया या खंडांमध्ये व्यापारी संबंध होते. ईसवी सनाच्या पूर्वीपासून व्यापारी तांडे, ज्यांना प्राचीनभारतात ‘सार्थ’ असे संबोधले जात होते. यांच्या माध्यमातून युरोप-आशिया यांच्यात व्यापार होत होता. हा सर्व व्यापार पंधराव्या शतकापर्यत प्रामुख्याने भूमार्गानेच होत होता. यामुळेच प्राचीन काळापासून पूर्व-पश्चिम यांना जोडणाऱ्या प्रख्यात आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गांची निर्मिती झालेली दिसते. या व्यापारी मार्गांनी केवळ एका देशातील माल दुस-या देशात नेण्याचेच काम केले नाही, तर एका देशातील संस्कृती-कला-भाषा-धर्म इत्यादींनाही सोबत नेले. यामुळेच या प्राचीन व्यापारी मार्गांचा एक अतिशय रंजक असा इतिहास उपलब्ध आहे.
भूमार्गानी चालत असलेल्या व्यापारात अनेक अडचणी होत्या. हा व्यापार प्रामुख्याने पशुंच्या भरोशावर होता,असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामध्ये मनुष्यबळ ही मोठया प्रमाणात लागत असे,त्या तूलनेत मालाची वाहतूक कमी होत असे. भौगालीक अडचणी, नैसर्गिक आपत्ती, काळाचा अपव्यय, मानवी अपप्रवृत्ती अशा अनेक अडचणी या व्यापारामध्ये होत्या. त्या तूलनेत समुद्रमार्ग अथवा जलमार्ग यांनी होणार्या व्यापारात पशुंची आवश्यकता नसणे,कमी मनुष्यबळ लागणे, अधिक मालवाहतूक,जलद प्रवास इत्यादी लाभ होते. कमी काळात अधिक माल दूर अंतरावरून आयात-निर्यात करणे,जलमार्गाने सुलभ होणार होते. पंधराव्या शतकातील युरोपीयन समाजाला याचे महत्व सर्वप्रथम लक्षात आले. युरोपीयन समाजाची महत्वकांक्षा अमर्याद झाली होती.
प्रंचड संपत्ती संपादन करण्याची आकांक्षा आणि जगावर राज्य करण्याची सत्ताकांक्षा पंधराव्या शतकात युरोपात बळावली. हा युरोपातील सर्व क्षेत्रातील प्रबोधनाचा (रेनसांस) आरंभकाळ होता. प्रबोधनकाळातील अनेक नवनिर्मितींपैकी एक म्हणजे युरोपातील साहसी दर्यावदी, त्यांनी शोधलेले नवीन जलमार्ग आणि अमेरिका-ऑस्ट्रेलीया अशा भूखंडांचा त्यांनी लावलेला शोध.
युरोपातील प्रबोधनाच्या कालखंडाने नकळतपणे आधुनिक जगाची पायाभरणी झाली. प्रबोधन युगपूर्व युरोप म्हणजे धर्माच्या पोलादी पंज्यात जखडलेले चैतन्यहीन कलेवर. युरोपातील राजसत्ता देखील धर्मसत्तेच्या ताटाखालचे मांजर झालेले होते. इसवी सनाच्या तिस-या-चौथ्या शतकात युरोपातील गुलामांनी विद्रोह करून रोमन साम्राज्याचा अंत केला. यानंतर युरोपात सार्वभौम असे साम्राज्य निर्माण होऊ शकले नाही. युरोपातील राजसत्ता छोटया-छोटया राज्यांमध्ये विखुरल्या,याचा लाभ धर्मसत्तेनी घेतला. दुर्बल राजसत्तांमुळे अखंड युरोपवर धर्मसत्तेचे अप्रत्यक्ष सार्वभौम साम्राज्यच निर्माण झाले. मध्ययुगीन काळात युरोपातील साठ टक्कांपेक्षा अधिक भूमी व संपत्ती चर्चच्या ताब्यात होती. मध्ययुगीन युरोपीयन समाज धर्मगुरू,सरंजामदार किंवा योद्धे आणि कष्टकरी अशा तीन स्तरांमध्ये विभागलेला होता. चर्चसंस्थेची संपत्ती व सत्ता वाढत जाऊन तिचे पारमार्थिक माहात्म्यापेक्षा तिचे आर्थिक माहात्म्यच वाढले.
भूदास म्हणून पशुवत राबणा-या कष्टकरी समाजाला सरंजामदार परवडत होते, कारण त्यांच्याकडून होणारे शोषण चर्चच्या तूलनेत बरेच कमी होते.या काळातचर्चने गरीब व आजारी लोकांना मदत केली हे मान्य केले,तरी या धर्मदाय कार्याचा उदोउदो अधिकच करण्यात आला. खरे पाहिले तर मध्ययुगीन काळातील सर्वात श्रीमंत व शक्तिमान जमीनदार चर्चसंस्थाच होती. हे लक्षात घेता उमराव-सरंजामदारांनी कष्टकरी वर्गासाठी जेवढी मदतीची कामे केली,तेवढी चर्चसंस्थेने केले नाहीत. हे वास्तवही नाकारता येत नाही. काही अभ्यासक म्हणतात चर्चने आपल्या भूदासांची एवढी जबरदस्त पिळवणूक केली नसती,तर उमराव-सरंजामदारांच्या अशा धर्मदाय कामांची आवश्यकता पडली नसती.
इतिहासाचे अवलोकन केल्यास असे लक्षात येते की,राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता जेंव्हा-जेंव्हा प्रभावी ठरली आहे,तेंव्हा-तेंव्हा सामान्य माणसाला याची प्रचंड किंमत चूकवावी लागली आहे. याचे अत्यंत ताजे उदाहरण म्हणजे तालिबानच्या प्रभावात गेलेला अफगाणिस्तान. एकेकाळी प्रागतिक विचार,आधुनिक जीवनशैली व सुख-शांती अनुभवलेला हा देश. आज कोणत्या अवस्थेत पोहचला आहे,याविषयी अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही धर्मपरंपरेचे आचरण मानवी जीवनाच्या नियमनासाठी आवश्यकच असते. मात्र त्याचे रूपांतर धर्मवेडात झाले आणि राजसत्तेचे नियंत्रण धर्मसत्ता करूलागली की,समाजाचा सर्वांगिण विकास खुंटतो.
धर्माच्या अवाजवी प्रभावात येऊन, सर्वप्रथम धर्मवेडा होणारा सामान्य माणूसच असतो. भविष्यात अशा धर्मवेडाची किंमत याच सामान्य माणसाला स्वतःचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य गमावून सर्वाधिक चूकवावी लागते. मध्ययुगीन काळात युरोपने हेच अनुभवले. मात्र जगात कोणत्याही अतिरेकाचा अंत ही ठरलेला असतो. त्यानुसारचर्चची ही धर्मसत्ता उलथवण्यासाठी अखेर धर्मयुद्धे आणि व्यापारवृद्धी कारणीभूत ठरली.
इसवी सनाच्या आठव्या ते अकराव्या शतकातापर्यत जेरूसलेमच्या पवित्र भूमीला भेट देण्यासाठी करण्यात आलेल्या यात्रा आणि ख्रिश्चन-मुसलमान यांच्यात या भूमीवर कब्जा मिळविण्यासाठी झालेल्या धर्मयुद्धांनी युरोपातील चर्चच्या धर्मसत्तेला सुरुंग लावला. याचवेळी दुसर्या बाजूला युरोपातील व्यापार विश्व विस्तारत होते. धर्मयुद्धांच्या निमित्त्याने पश्चिम व पूर्व जगातील लोक नकळतपणे एकमेकांच्या भूमीत व सहवासात आले. त्यांच्यात विविध स्तरावर आदानप्रदान सुरु झाले. यामुळे व्यापारालाही चालना मिळाली. काही अभ्यासकांच्या मते ही धर्मयुद्धे व्यापारवृद्धीसाठी व्यापारी वर्गानेच प्रायोजित केलेली होती. धर्मगुरू, संरजामदार व कष्टकरी भूदास अशी समाज रचना असलेल्या युरोपात व्यापा-यांचा प्रभावी भांडवलदार वर्ग निर्माण झाला.
भांडवलदारीच्या आगमनाने युरोपयीन समाजाच्या सुस्त, सनातन, कर्मठ चौकटीला हादरे बसू लागले. धर्माच्या टाचेखाली दबलेल्या या समाजातील प्रत्येक घटकाच्या मनातून विद्रोहाची गाज ऐकू येऊ लागली. अजगरासारखा सुस्त असलेल्या युरोपनी कात टाकली. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जुनाट-बुरसटलेले नाकारत नव्याची स्थापना होऊ लागली. प्रबोधनाचा कालखंड प्रारंभ झाला. मध्ययुगीन काळातून आधुनिकतेकडे प्रवास आरंभ केलेल्या युरोपाने आपले क्षितिजं विस्तारण्यासाठी नवीन भूमीचा शोध घेण्याचे ठरवले. यातूनच साहसी दर्यावदी आणि त्यांच्या सागरी मोहिमा यांना प्रोत्साहन मिळाले. कोलंबससारख्या अनेक दर्यावदींनी केलेले हे समुद्रमंथन प्रबोधन कालीन युरोपच्या इतिहासातील सुवर्णपान ठरले. यातच अमेरिका या भूखंडाच्या शोधाची बीजं दडली होती.
प्रा.डॉ.राहुल हांडे
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
(लेखक धर्म, इतिहास व साहित्याचे अभ्यासक आहेत)