मुंबई | Mumbai
मुंबईत मल्टिप्लेक्समध्ये मराठीऐवजी हिंदी चित्रपटांच्या शोसाठी स्क्रीन दिल्या जात असल्याच्या तक्रारी नव्या नाहीत. आता यशराज फिल्म्सचा सैयारा सिनेमासाठी मराठीतील ‘ये रे येरे पैसा ३’ या मराठी सिनेमाचे शो रद्द करण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. मराठी सिनेमांसाठी लढणारे, मराठी सिनेमांना थिएटमध्ये शो मिळावे यासाठी आंदोलन करणारे अमेय खोपकर यांच्याच सिनेमाला आता स्क्रीन दिल्या जात नसल्याचे समोर आलेय. ‘येरे येरे पैसा ३’ या मराठी सिनेमाच्या स्क्रीन कमी करून त्या ‘सैयारा’ला देण्यात आल्याने मनसे आणि मल्टिप्लेक्स मालक पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ये रे येरे पैसा ३ ला स्क्रीन मिळत नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे. या चित्रपटाची निर्मिती अमेय खोपकर यांनी केली आहे. ‘माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही मात्र इथुन पुढे काचा फुटणार’ असा इशाराच खोपकर यांनी दिलाय.
‘जी भाषा वापरलीय त्याप्रमाणे स्क्रीन मिळावी म्हणून सरकारदरबारी जावं लागणं हेच दुर्देव आहे. ये रे ये रे पैसा ३ ला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याच दिवशी सैय्यारा चित्रपटही प्रदर्शित झाला त्यालाही प्रतिसाद मिळाला. मात्र दुसऱ्या आठवड्यात थिएटरमध्ये अक्षरशः एकही शो दिलेला नाही. हा माझ्यावर असलेला राग मल्टीप्लेक्स वाल्यांनी काढला आहे. माझ्या चित्रपटासाठी मीच आंदोलन करावे असे मला वाटत नाही मात्र इथून पुढे मल्टिप्लेक्सच्या काचा फुटतील, असा इशाराच खोपकर यांनी दिला.
या प्रकरणावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “येरे येरे पैसा ३ च्या स्क्रीन कमी करण्यामागे केवळ सुडाचे राजकारण आहे. आम्ही पक्षातर्फे मल्टिप्लेक्स मालकांना इशारा देत आहे की, मराठी सिनेमाच्या स्क्रीन्स कमी करू नका, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने लावू.” देशपांडे पुढे म्हणाले की, आज आमची बैठक झाली, त्याबद्दल सविस्तर सांगता येणार नाही. पण हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमाची गळचेपी होत आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. अमेय खोपकर यांची निर्मिती असलेल्या सिनेमावर अशी अन्यायकारक वागणूक दिली जात आहे, मल्टिप्लेक्स मालक हे जाणूनबुजून करत आहेत.
हेच दुर्दैव आहे
संजय राऊतांनीही पक्ष न बघता ट्विट केले. सुशांत शेलारांनीही पाठराखण केलीय त्यांचे आभार. ज्यांच्यासाठी मी आजवर उभा राहिलो, केसेस अंगावर घेतल्या ते आज एका शब्दाने बोलले नाहीत. जेव्हा स्वतःच्या चित्रपटाला थिएटर मिळत नाही तेव्हा शिवतीर्थवर येता ,आज तुम्ही एका शब्दानेही बोलत नाही, असे म्हणत खोपकर यांनी यावर व्यक्त न होणाऱ्या कलाकारांना टोला लगावला आहे.
मराठी चित्रपट थिएटरमध्ये लागावा याकरता सरकारकडे विनंती करावी लागत असेल तर हेच दूर्देव आहे. नितेश राणेंची ही कुठली भाषा झाली तुम्ही सरकारकडे या मग आम्ही बघू, मी काही सरकारदरबारी वगैरे जाणार नाही, असेही खोपकर यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





