लोणी । प्रतिनिधी
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे शनिवारीपासून अहिल्यानगर दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. काल रात्री शिर्डीत दाखल झाल्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुमारे पाऊण तास बंद दाराआड महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बैठकीत शेतकऱ्यांच्या पंचनाम्याची प्रक्रिया गतीमान करण्याबाबत तसेच केंद्र सरकारकडून तातडीने आर्थिक मदत देण्याच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याचे कळते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लोणी बाजारतळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात भाष्य करत महत्त्वाची माहिती दिली. अजित पवार म्हणाले, “काल रात्री आम्ही सर्व नेते अतिवृष्टीच्या परिस्थितीवर चर्चा केली. पंचनाम्याची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी आणि अहवाल त्वरित केंद्राला पाठवावा, असे अमित शाह यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. शाह यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून प्रस्ताव मिळताच केंद्राकडून लवकरात लवकर मदत दिली जाईल.”
याच कार्यक्रमात अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातील अमित शाह यांच्या भूमिकेचेही कौतुक केले. त्यांनी सांगितले, “सहकार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता-पुत्रांच्या पुतळ्यांचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते होणे हा खरोखर दुग्धशर्करा योग आहे. 1985 पासून साखर कारखान्यांवर आयकर लावण्यात आला होता. मात्र अमित शाह यांनी त्या कराची रद्दबातल घोषणा केली. त्यामुळे तब्बल 9,500 कोटी रुपयांचा करमाफ झाला आणि लाखो शेतकऱ्यांना तसेच कारखान्यांना दिलासा मिळाला.”
अजित पवार यांनी केलेल्या भाषणात अमित शाह यांचे सहकार क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे. अगदी अठराशे, दोन हजार रुपयांपर्यंत साखरचे भाव असायचे. पण एमएसपीनुसार दर मिळायला लागल्यापासून कितीही झाले तरी ३१०० च्या आत साखर विकता येत नाही. अमित शहा यांच्यामुळे सारखं उद्योगाला बळ मिळाले, असे अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “अमित भाई सांगतात की कमी पाणी आणि कमी खतात ऊस पिकवा, एआयचा वापर करा. केंद्र सरकार मदतीसाठी तत्पर आहे. बायप्रोडक्टविषयीही शाह यांनी विशेष लक्ष दिले असून, काही कारखाने निवडून नवीन उत्पादने तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.” अजित पवार यांनी साखर उद्योगाच्या सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. “पूर्वी साखरेचे भाव २१०० रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत ३३०० रुपयांच्या खाली साखर विकली जात नाही. त्यासोबत इथेनॉल आणि इतर बायप्रोडक्ट्समुळे उद्योगाला नवीन दिशा मिळत आहे,” असे त्यांनी सांगितले.
शेवटी त्यांनी राजकीय एकतेचे आवाहन करत म्हटले, “निवडणुकीच्या वेळी राजकारण करा, पण त्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. शेती आणि सहकार क्षेत्र सशक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही गंभीर आहेत.” शिर्डीतील या भेटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मदतीचा मार्ग मोकळा होणार असल्याची आशा निर्माण झाली आहे. तसेच सहकार चळवळीच्या विकासासाठी अमित शाह यांनी घेतलेली भूमिका शेतकरी आणि कारखानदारांसाठी नवी प्रेरणा ठरत आहे.




