मुंबई –
बॉलिवूडचे महानायक ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज 78वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील महान कलाकारांपैकी
ते एक आहेत. गेल्या 5 दशकांपासून ते चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. 7 नोव्हेंबर 1969मध्ये त्यांचा पहिला चित्रपट सात हिंदुस्तानी प्रदर्शित झाला. 1969 मध्ये सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही यशस्वीरित्या सुरू आहे.
लाखो-करोडोचे मालक असणारे अमिताभ बच्चन एकेकाळी चित्रपटसृष्टीत भाग बनण्यासाठी खूप कष्ट करत होते. एका कंपनीत नोकरी करत होते. पण एकेदिवशी त्यांना एका चित्रपटात काम मिळाले. या चित्रपटात काम मिळण्याचा किस्सा आणि या चित्रपटात काम करण्यासाठी किती पैसे अमिताभ बच्चन यांना मिळाले ते जाणून घ्या.
अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट सात हिंदुस्तानी आहे. या चित्रपटाचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन ख्वाजा अहमद अब्बास यांनी केले आहे. या चित्रपटात गोवा पोर्तुगाली शासनापासून मुक्त करणार्या सात हिंदुस्तानींची कथा आहे. या चित्रपटात उत्पल दत्त, मधु, एके हंगल यांसह अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तसेच टीनू आनंद कवीच्या भूमिकेत होते आणि अमिताभ बच्चन टीनू आनंद यांच्या मित्रांचा भूमिकेत होते. कवीची भूमिका या चित्रपटात खूप महत्त्वाची होती. पण काही कारणामुळे टीनू आनंद यांना या चित्रपट सोडून द्यावा लागला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना कवीची मुख्य भूमिका मिळाली आणि अशा प्रकारे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटला सुरुवात झाली.
अमिताभ बच्चन यांना त्यावेळेस या भूमिकेसाठी 5 हजार रुपये दिले गेले होते. परंतु बच्चन यांना यापेक्षा जास्त पैसे हवे होते. तरीदेखील त्यांनी 5 हजार रुपये घेऊन चित्रपट केला. या चित्रपटाने खास अशी कमाल केली नाही, परंतु या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले.