बॉलिवुडमध्ये बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन हे त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जातात.
ऑन स्क्रीन अँग्री यंग मॅनची ओळख निर्माण करणारे अमिताभ बच्चन खऱ्या आयुष्यात तितकेच मृदूभाषी असल्याचं त्यांच्या अनेक कार्यक्रमांमधून आणि सामाजिक उपस्थितीमधून ठळकपणे समोर येतं.
मात्र, आपल्या नावाचा, फोटोंचा किंवा आवाजाचा गैरवापर होत असल्याचं पाहून बिग बी चांगलेच संतप्त झाले आहेत. याविरोधात त्यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयानंही त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भात अंतरिम आदेश देऊन बिग बींना दिलासा दिला आहे.
न्यायमूर्ती चावला यांनी अथॉरिटी आणि टेलिकॉम डिपार्टमेंटसाठी आदेश जारी केले आहेत. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले अमिताभ बच्चन यांचे फोटो, नाव किंवा पर्सनॅलिटी ट्रेट्स त्वरित हटवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
त्याचप्रमाणे टेलिकॉम सर्व्हिस प्रोवायडरकडून कोर्टाने अशा काही फोन नंबर्सची माहिती मागितली आहे जे बिग बींचं नाव किंवा त्यांच्या आवाजाचा अवैध वापर करत आहेत. कोर्टाने इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडरलाही अशा प्रकरणाशी संबंधित ऑनलाइन लिंक्स काढून टाकण्यास सांगितलं आहे.
सध्या अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती च्या शुटिंग मध्ये व्यस्त आहेत. नुकताच त्यांचा ऊंचाई हा सिनेमा आला होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.