अमरावती । Amravati
अंधश्रद्धेच्या गर्तेत अजूनही ग्रामीण भागात निरागस बालकांच्या जीवाशी खेळले जात आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावात केवळ 10 दिवसांच्या बाळावर गरम विळ्याचे तब्बल 39 चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा अमानुष प्रकार पोटफुगीच्या आजारावर उपचार करण्याच्या नावाखाली करण्यात आला असून, या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी पीडित बाळाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून, चिखलदरा पोलिसांनी संबंधित एका वृद्ध महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या महिलेवर बालकासोबत अमानुष वागणूक, शारीरिक इजा आणि अंधश्रद्धेच्या आधारे त्रास देण्याचे आरोप आहेत, अशी माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.
दहेंद्री गावातील रहिवासी रिचमू धोंडू सेलूकर (वय 25) यांनी 15 जून रोजी एका कन्या बाळाला जन्म दिला. बाळाची प्रकृती सुरुवातीला उत्तम होती, मात्र काही दिवसांनी तिला सर्दी आणि पोटफुगीचा त्रास जाणवू लागला. स्थानिक नर्सने तपासून काही औषधोपचार दिले होते. मात्र, 25 जून रोजी गावातीलच एका वृद्ध महिलेने “डंबा” म्हणजे गरम लोखंडी वस्तूने उपचार करण्याचा सल्ला दिला. तिच्या म्हणण्यानुसार पोटफुगीवर हा उपाय उपयोगी ठरतो. त्यामुळे तिने गरम विळ्याने बाळाच्या पोटावर तब्बल 39 चटके दिले. या अघोरी उपचारांमुळे बाळाच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या.
4 जुलै रोजी पुन्हा एकदा नर्स त्या घरात आली असता तिला बाळाच्या पोटावरील खोल जखमा दिसल्या. तिने कोणतीही विलंब न करता बाळाला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. त्यानंतर बाळाला पुढील उपचारांसाठी अचलपूर येथील स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळावर बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय शिरसमकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे बाळाची प्रकृती स्थिर झाली असून, 5 जुलै रोजी तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
ही घटना काही अपवाद नाही. केवळ चार महिन्यांपूर्वीच चिखलदरा तालुक्यातील थिमोरी गावातही असाच एक प्रकार घडला होता. तेथे 22 दिवसांच्या बाळावर “डंबा” देण्यात आला होता. हे दाखवतं की, अजूनही ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि अघोरी उपचारांची प्रथा कायम आहे. ग्रामीण भागात पोटफुगी, अंगदुखी अशा लहानसहान आजारांवर गरम वस्तूंनी चटके दिल्यास आराम मिळतो, असा अवैज्ञानिक आणि घातक समज आजही काही लोकांमध्ये रुजलेला आहे. परिणामी, अशा अघोरी उपायांमुळे बालकांवर अमानुष अत्याचार केले जातात.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने ग्रामीण भागात अंधश्रद्धेविरोधात व्यापक जनजागृती मोहिम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. आरोग्याशी संबंधित चुकीचे समज दूर करणे आणि बालकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, दोषींवर कठोर कारवाई करून इतरांना धडा शिकवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. “अशा अमानवी कृतींना थांबवण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.





