– राजेंद्र पारे
सतराव्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार आहे. तसा महाराष्ट्रात गोंधळ, जागरण, बळीराजा आणि महासुभा, ज्योतिबा यांच्या कार्याची जागृतीपर गीतगायन जागरण, वाघ्यामुरळी, दशावतार, बहुरुपी, वासुदेवाची गाणी, पोतराज इ. लोककलाप्रकार प्रचलित होते. या सर्व नाट्यात्मक लोककलाप्रकारात आणि तमाशामध्ये तांत्रिक अंगाच्या दृष्टीने आणि वाङ्मयीन बाजूने काही प्रमाणात साधर्म्य आढळते. तमाशा हा गण, गौळण, लावणी, बतावणी आणि वग अशा पाच अंगांनी समृद्ध झालेला आहे.
‘भारतीय सांस्कृतिकोशा’त ‘तमाशा’ या शब्दाच्या उत्पत्तीविषयी ‘तमाशा’ हा शब्द अरबी असून त्याचा अर्थ ‘प्रेक्षणीय दृश्य’ असा आहे. तमाशा संस्थेच्या शिल्पकारांना असलेली ‘शाहीर’ ही संज्ञाही मूळ ‘शायर’ किंवा ‘शाहर’ या अरबी शब्दापासून बनलेली आहे. तमाशा संस्थेचे आणि तिच्या शिल्पकाराचे नाव अरबी असल्यामुळे ही संस्था मुसलमानांच्या प्रभावातून उदय पावली असावी, असा काही विद्वानांचा कयास आहे. ‘तमाशा’ परंपरेविषयीचा संदर्भ मराठी विश्वकोशातही सापडतो, तो ‘तमाशा’ हा शब्द मूळचा मराठी भाषेतील नसून तो उर्दूतून मराठीत आला आहे. 13-14 व्या शतकात दक्षिण भारतात मुसलमानी अंमल सुरु झाल्यापासून तो मराठीत आढळतो. एकनाथांच्या एका भारुडात ‘बड़े बड़े तमाशा ‘देखें’, अशी ओळ आहे, अशी माहिती तमाशाच्या जन्माविषयी सापडते.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला वीरांच्या विषयवासनेवर उतारा म्हणून जन्मलेला हा खेळ 19व्या शतकाच्या सुरुवातीला भक्ती, नीति, ब्रह्मज्ञान यात आला. म्हणजे तमाशाचे हाड शूरवीरांच्या शृंगाराचे, तर मांस सात्त्विकतेचेच दिसते. हाडाचे वळण आणि मासांने दिलेला आकार यांनी प्रकृती बनते, तसे शृंगाराच्या हाडाने आणि सात्त्विकतेच्या मांसाने तमाशाचे शरीर बनले आहे. तमाशाच्या गाडीचे एक चाक शृंगाराचे तर दुसरे ब्रह्मज्ञानाचे होते. या दोन्ही चाकांना जोडणारा कणा शूरवीरांच्या पराक्रमाचा होता, असे नामदेव व्हटकर म्हणतात. तमाशाचे खरे स्वरूप जरी पेशवाईतच उत्तर पेशवाईतच उदयास आले असले तरी तो प्रकार महाराष्ट्रात पूर्वीपासूनच अस्तित्त्वात होता असे दिसते.
खान्देशात अनेक लोकनाट्य कलावंत होऊन गेलेत. रसुलभाई पिंजारी, धोंडू-कोंडू पाटील, अर्जुन कोळी, बुधा कोळी, नथुभाऊ सोनवणे, जुलाल सोनवणे, शंकरराव कोचुरे, आनंदा अहिरे, भिका भीमा यासारख्या कलावंतांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करुन खान्देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. असे असल्यावरदेखील मराठी साहित्याने पाहिजे तेवढी दखल घेतलेली आपल्याला दिसत नाही आणि ते धाडस देवीलाल बाविस्कर यांनी केली आहे. खेडोपाडी जाऊन, पत्ता मिळाला की तेथे जाऊन, ज्यांच्याविषयी कोणीच दखल घेतली नाही किंवा दोन ओळीही लिहून आल्या नाहीत असे कलावंत ते शोधत राहिले. अनेक अनुभव त्यांना मिळाले, काहींनी तिरस्कार केला, पण जिद्दीने त्यांनी तो प्रवास पूर्ण केला. जुने कलावंत आणि नवे कलावंत यांच्या जीवनातील अनेक अनुभव त्यांनी जसा आहे तसाच, अगदी साध्या सोप्या शब्दात मांडला. त्यामुळेच तो आपल्याला खात्रीचा वाटतो. लेखक आपल्या मनोगतात मांडतात, तुम्ही जर आमच्या वडिलांविषयी लिहिले, तर आम्हाला तमाशावाल्यांची मुले म्हणून हिणवतील. असे कारणे देऊन त्यांना विरोध केला. भयावह चित्र आहे असे मला वाटते. आजही तमाशा आहे, तमाशा पाहिलेले लोके आहेत, पण पुढे मात्र तमाशा म्हणजे काय असेही सांगण्यासाठी काही शिल्लक राहील की नाही याबाबत शंका वाटते. प्रस्तावनेत दंगलकार नितीन चंदनशिवे लिहितात, ‘उलट पडद्यावर घुंगरु बांधून नाचणारी स्त्री ही अभिनेत्री झाली आणि फडात नाचणारी ही तमासगीर झाली.’ आजही तमाशा कलावंतांस सन्मान मिळत नाही ही समाजाची शोकांतिका आहे, असे मला वाटते.
खान्देशातील लोकनाट्य तमाशातील कोणती पात्रे असतात त्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा या पुस्तकात केली आहे. 1)झिलकारी-आलाप घेणे. लोकनाट्य तमाशात झिलकारीला खूप महत्त्व आहे. मैनाबाई प्रसिद्ध होती. 2)सोंगाड्या- सोंगाड्या कोण आहे यावर तमाशाची रंगत ठरलेली असते. खान्देशात सरदार पिंजारी, रसुलभाई पिंजारी, देवराम सोंगाड्या, भोजू पाथरवट, काशिनाथ सोंगाड्या, उद्धव कोचुरे, दत्तोबा गुरव, धोंडू पाटील असे अनेक विनोदवीर प्रसिद्ध होते. 3)सरदार-तमाशा कलेची पूर्ण जाण असलेला कलाकाराकडे सरदाराची पात्र असे. शक्यतो नाचकाम सोडलेल्या कलाकार सरदाराची भूमिका पार पाडतात दिसतो.
4) राजा- हे पात्र शक्यतो तमाशा मालकच असतात. त्यांच्या नावाने तमाशा चालतो. 5) राणी-ज्येष्ठ नाच्या हा राणी पात्र करीत. पंडित नाच्या, गीता नाच्या, खंडू, ताराचंद, रतन, श्रीपत नाच्या हे पात्र सर्वांच्या लक्षात राहणारे असेच ठरले.
लेखक बाविस्कर यांनी एक टिप्पणी मांडली आहे की, ‘महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशात ‘सखी’ हा प्रकार फक्त खान्देशातील तमाशात दिसून येतो.’ गण, गवळण व रंगबाजी झाल्यानंतर वगनाट्य सादर करण्याअगोदर राजाचे पात्र करणारा सखी म्हणत. यालाच सखी टाकणे असे म्हणतात. हा काव्यप्रकार असून तो कोड्याच्या स्वरुपात असतो.रघुनाथ बाबा, मंगलदास, पुंडलिक मास्तर, सीताराम सोनार, पाटील बाबा घोडगावकर यासारख्यानी सखीचे रचना केलेली दिसते. खान्देशातील तमासगीर कलाकारांचे मराठी साहित्यात स्थान नाही म्हणून लेखक देवीलाल बाविस्कर यांनी कसलाही स्वार्थ न बाळगता त्यांच्या वेदना, कला आणि भोगलेले आयुष्य आपल्यासमोर यावे हा मुख्य हेतूने लेखन केले आहे. खान्देशातील लोककलावंत आपल्यापर्यंत आणण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगे असाच आहे. खान्देश लोकनाट्य तमाशाचा आणि कलावंत यांचा पूर्व इतिहास, कलावंतांचा लोकजागर, तमाशा तगतराव व हजेरी, गण, गवळण, फार्स किंवा रंगबाजी, तमाशातील पात्रे, पोवाडा गायन, तमाशा कलावंतांचे उघड्यावरचे जीवनाबाबत लेखकाने महत्त्वपूर्ण माहिती विवेचित केली आहे. याबरोबरच जुने तमाशा कलावंत यांचा परिचय आणि त्यांची कामगिरी याबाबत इत्यंभूत माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
लोकनाट्य तमाशा कलेचे उपासक धोंडू-कोंडू पाटील शिंदीकर, खान्देशभूषण रसुलभाई पिंजारी, प्रतिभावंत कलावंत नथुभाऊ सोनवणे भोकरकर, तमाशा कलेचे संवर्धक आनंद महाजन जळगावकर, अहिराणी (गीतकार) भाषेचे चालतेबोलते विद्यापीठ आनंदा अहिरे वराडकर, रंगबाज सोंगाड्या भोजुभाऊ पाथरवट, तमाशा कलावंत शंकरराव कोचुरे खिर्डीकर, खान्देश लोकनाट्य तमाशातील कोहिनूर हिरा भिकाभाऊ सांगवीकर, चतुरंगी कलाकार मग्न गुरव रजाळेकर, अभिनय सम्राट भिमाभाऊ सांगवीकर, विनोदवीर दत्तोबा गुरव नगरदेवळेकर, खलनायक संतोषभाऊ ईशी कोडदेकर, तमाशातील नटरंग पंडित नाच्या, लोककलावंत शाहीर बारकू पिराजी जोगी यांच्याबाबतीत खोलवर माहिती आपल्याला मिळेल. तमाशाचा फडात आपली जिंदगी घालवलेल्या कलावंताचा इतिहास पुढील पिढीसाठी अभ्यासता यावी म्हणून केलेली सोय आहे असे मला वाटते. यानिमित्ताने लेखक देवीलाल बाविस्कर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि पुढील साहित्य निर्मितीसाठी शुभेच्छा.
श्र खान्देश लोकनाट्य तमाशा (लोककला आणि साहित्य)
श्र लेखक – देवीलाल बाविस्कर
श्र प्रकाशन – अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव
श्र मूल्य – 225
– ‘राजगृह’ बोरोले नगर-3, चोपडा, जि.जळगाव