नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar
तत्कालीन डाक सहायकाने एका बचत पोष्ट खातेधारकाच्या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमाक बदलून नवीन एटीएम कार्ड मिळवित विविध एटीएममधून खातेधारकाच्या बचत खात्यातून परस्पर 82 हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार नंदुरबार येथील पोष्ट कार्यालयात दि.24 मार्च 2021 ते 17 मे 2021 या कालावधीत घडला. याप्रकरणी नंदुरबार डाक निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन डाक सहायक तथा सद्या मुंबई पीजीओ डाक कार्यालयातील कार्यरत प्रितम संतोष वराडे याच्याविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तांबोळी गल्लीतील राहणारी नेहा गोपाल शाह यांचे नंदुरबार डाक पोस्ट कार्यालयात बचत खाते आहे. या खात्यात रक्कम जमा होती. परंतु नेहा शाह या पैसे काढण्यास गेल्यावर खात्यात रक्कम कमी असल्याचे लक्षात आल्यावर यासंदर्भात त्यांनी तक्रार केली. या तक्रारीची चौकशी झाल्याने नंदुरबार पोस्ट कार्यालयातीलच तत्कालीन डाक सहायक प्रितम संतोष वराडे याने नेहा शाह यांच्या खात्यातून परस्पर तब्बल 82 हजार रूपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डाक सहायक प्रितम वराडे याने नेहा शाह यांच्या पोस्टातील बचत खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक कुणास काही न सांगता तत्कालीन सहायक पोस्ट मास्टर फिरोजखान सफिदाखान पठाण यांच्या परवानगीविना त्यांच्या युसर आयडीचा वापर करीत परस्पर दुसरा मोबाईल क्रमांक टाकून घेतला. तसेच मोबाईल नंबर बदल्याचा व्हेरिफिकेशन पोस्ट मास्टर भालचंद्र सुधाकर जोशी यांच्या परवानगीशिवाय त्यांचे युसर आयडीचा उपयोग करून स्वतःच व्हेरीफाय करून घेता नेहा शाह यांच्या बचत खात्याशी जोडून घेतला. यासंदर्भात नेहा शाह यांना कुठलीही माहिती न देता परस्पर एटीएम कार्डसाठीच फॉर्म भरून त्यावर खातेधारकाची बनावट सही करून डाक सहायक प्रितम वराडे याने शाह यांच्या नावाचे एटीएम कार्ड मिळवून घेत स्वतःकडे ठेवले. त्यानंतर एटीएम कार्डच्या सहायाने डाक सहायक प्रितम वराडे याने दि.6 एप्रिल 2021 ते 1 मे 2021 या कालावधीत धुळे व नंदुरबार येथे विविध एटीएममधून 82 हजार रूपये नेहा शाह यांच्या पोस्टातील बचत खात्यान परस्पर काढून घेत स्वतः वापरुन फसवणूक केली.
याप्रकाराचा उलगडा झाल्याने प्रितम वराडे याने 82 हजाराची रक्कम व्याजसह परत केली आहे. परंतू पोस्ट कार्यालय व खातेधारकाची फसवणूक केल्याचा प्रकार तत्कालीन डाक सहायक प्रितम संतोष वराडे याने केला. याबाबत नंदुरबार डाक कार्यालयातील डाक निरीक्षक सोनु उत्तम बोरसे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदुरबार डाक कार्यालयातील तत्कालीन डाक सहायक तथा सध्या मुंबईत जीपीओ डाक कार्यालयातील कार्यरत प्रितम संतोष वराडे याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.