Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

देवळा | प्रतिनिधी

- Advertisement -

देवळा तालुक्यातील कापशी फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या अपघातात निंबा केदा भदाणे (वय ६७, रा. कापशी) यांचा मृत्यू झाला. ते रस्त्याच्या कडेला उभे असताना नाशिककडून देवळ्याकडे येणाऱ्या नाशिक–नंदुरबार (एमएच-१४-केक्यू-०२४५) या एसटी बसने त्यांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, भदाणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी दिवाकर भास्कर भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात बसचालक सुनील सजन शिंदे (रा. नाशिक) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

अपघाताची माहिती मिळताच सटाणा एसटी आगारातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मृताच्या वारसांना १० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच अपघात भरपाईचा दावा मंजूर झाल्यानंतर १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती सटाणा आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी दिली.

दरम्यान, विंचूर–प्रकाशा मार्गावरील एनएच-७५२जी राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण झाल्यानंतर कापशी–भावडे चौफुली आणि भावडबारी घाटाचा तीव्र उतार हा परिसर अपघातप्रवण बनला आहे. या ठिकाणी गतीरोधक, इशारा फलक, वेगमर्यादा नियंत्रण आणि अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मथळ्यांचे पर्याय

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ मध्ये नाशिक जिल्ह्यातील जलसंवर्धन...

0
नाशिक । जिमाका वृत्तसेवा Nashik प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' केली. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलसंवर्धन उपक्रमाची त्यांनी दखल घेत...