Saturday, July 27, 2024
Homeअग्रलेखसुसंस्कृत राजकारणाचे उदाहरण

सुसंस्कृत राजकारणाचे उदाहरण

रस्त्यांची दूरवस्था लोकांची कायमची डोकेदुखी ठरु शकेल अशीच सद्यस्थिती आहे. सर्वदूर रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्यासाठी यंदा पडलेल्या कोसळधार पावसाचे कारण पुढे केले जात असले तरी रस्त्यांच्या दूरवस्थेचे तेवढे एकच कारण असते का? रस्ते बांधतांनाच ते दर्जेदार बांधले जातील याची दक्षता घेतली जात नसावी का? खराब रस्त्यांचा त्रास सर्वांनाच भोगावा लागतो. टक्केवारीचे गणितही रस्त्यांना भोवते हे आता जनताही जाणून आहे. पण जनतेची अवस्था ‘मुकी बिचारी कोणीही हाका’ अशीच झाली आहे. पण मध्यप्रदेशात मात्र नुकतेच काहीसे आक्रीत घडले.  
एक रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार केला गेला अशी स्थानिक लोकांची तक्रार होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तक्रारीची दखल तर घेतलीच पण एका जाहीर कार्यक्रमात स्थानिक लोकांची माफीही मागितली. ही घटना मध्यप्रदेशात घडली. जबलपूर-मंडाल हा 62 किलोमीटरचा रस्ता दुपदरी बनवायचे काम सुरु आहे. रस्त्याच्या कामासाठी चारशे कोटींचा निधी मंजूर आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या लोकांच्या तक्रारी होत्या. मंडालमधील रस्ते कामांच्या भुूमिपुजन कार्यक्रमाला गडकरी उपस्थित होते.

त्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लोकांची माफी मागितली. रस्त्याचे जे काम झाले त्यात दुरुस्तीचे आणि उर्वरित काम त्वरीत थांबवण्याचे आदेश दिले. रस्त्याच्या कामाच्या नव्याने निविदा काढाव्यात असेही त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना बजावले. केंद्रसरकारमधील कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष मंत्री अशी गडकरींची ओळख आहे. मनमोकळेपणे भावना व्यक्त करणे हा त्यांचा स्वभाव मानला जातो. गडकरी हातचे राखून काही बोलत नाहीत असे त्यांचे सहकारी म्हणतात. मंडालवासियांनी त्याचा नुकताच अनुभव घेतला. हा गडकरी यांचा व्यक्तिगत मोठेपणा तर आहेच, पण राजकीय संस्कृती कोणत्या उंचीवर असायला हवी याचा नमूना त्यांनी त्यांच्या वागण्यातून सर्वांसमोर ठेवला.

- Advertisement -

अधिकारांचा वापर असाही करता येतो हे त्यांनी त्यांच्या कृतीतून स्पष्ट केले. मराठी मुलखाला जसा सामाजिक सुधारणांचा प्रदीर्घ इतिहास आहे तसाच तो राजकीय संस्कृतीचा देखील आहे. स्व.यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आदींनी राजकीय सभ्यतेचे धडे समाजाला घालून दिले. राजकीय सहिष्णूतेचे प्रत्यंतर वारंवार आणून दिले. तथापि हा वारसा लयाला जात आहे का? अनेकांची बेताल बडबड आणि एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणे ही नवी राजकीय संस्कृती बनली असावी का?

अनेकांनी राजकीय सभ्यता खुंटीला टांगली असावी का? राजकीय सहिष्णूतेचा आणि सभ्यतेचा संकोच होत चालला आहे का? अनेकांच्या बोलण्यात सभ्यसेचा लवलेशही का आढळत नसावा? असांसदीय शब्द बोलल्याबद्दल किती जण माफी मागतात? काहींनी मागितली तरी त्यांच्या माफीनाम्यात पश्चातापाचा लवलेशही शोधून का सापडत नसावा? काहींना निवडणुकीची घाई तर काहींना पद टिकवायची घाई. असांसदीय शब्दांचा वापर करण्याची जणू काही स्पर्धाच लागली असावी असाच अनेकांचा खाक्या आढळतो.

या सगळ्या गदारोळात जनतेच्या प्रश्नांकडे मात्र सर्रास दुर्लक्ष होते त्याचा विचार तरी किती जण करतात? लोकहिताला किती जण प्राधान्यक्रम देतात? गडकरींनी मात्र तो दिला आहे. निकृष्ट रस्त्यामुळे लोकांना होणारा त्रास जाणून आहोत हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. राजकारणात सुद्धा संस्कृती टिकवायची असेल तर काय करणे आवश्यक आहे याची जाणीव गडकरी यांनी करुन दिली. तो धडा इतरेजनांनी घेण्यासारखा आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या