देवगाव। वार्ताहर Devgaon
प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे उदाहरण देणारी घटना (दि.20) रोजी भरवसफाटा-कोळपेवाडी रस्त्यालगत महालक्ष्मी मंगल कार्यालयात घडली. विवाहसोहळ्यात हरवलेली 2 तोळ्यांची सोन्याची पोत प्रामाणिकपणे मूळ मालकिणीकडे परत करण्यात आली.
विवाहसोहळ्यात एका महिला पाहुणीची पोत हरवल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. याच दरम्यान कार्यक्रमास उपस्थित असलेले दीपक सूर्यवंशी (ता. नाशिक) यांच्या निदर्शनास ती पोत आली. त्यांनी कोणत्याही प्रकारचा मोह न ठेवता महालक्ष्मी मंगल कार्यालय संचालक भाऊसाहेब दुघड यांच्याकडे सुपूर्द केली.
दुघड यांनी सूर्यवंशी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. दुघड यांनी सदर पोत तत्काळ संबंधित महिलेस परत करत आपली जबाबदारी आणि प्रामाणिक वृत्ती अधोरेखित केली. त्यांच्या या पारदर्शक आणि प्रामाणिक कृतीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.
आजच्या धावपळीच्या आणि अनेकदा स्वार्थी वाटणार्या समाजात अशी प्रामाणिकता दुर्मिळ होत चालली असताना सूर्यवंशी आणि दुघड यांनी दाखवलेली सजगता आणि प्रामाणिकपणा निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरेल . यामुळे दीपक सूर्यवंशी व दुघड यांचे अभिनंदन होत आहे.