Wednesday, June 19, 2024
Homeअग्रलेखलोकसहभागाचा अभिनव प्रयत्न

लोकसहभागाचा अभिनव प्रयत्न

उद्या घरोघरी गणरायाचे थाटात आणि सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात आगमन होईल. त्याची प्रतिष्ठापना केली जाईल. गणपतीबाप्पा सर्वांचे लाडके. त्यामुळे गणेशोत्सवाचे दहा दिवस उत्साहाने भारून जातील. सार्वजनिक मंडळांचे देखावे उभारणे कधीच सुरु झाले आहे. अनेक मंडळांनी त्यांचे देखावे कसे असतील हे जाहीर देखील केले आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता असेल. उत्सवाचे शेवटचे काही दिवस रात्री उशीरपर्यंत देखावे दर्शन आणि लाउड्स्पिकरला सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे दुधात साखर पडल्याची भावना गणेशभक्तांमध्ये निर्माण झाली असणार.

- Advertisement -

उत्सवाच्या अंतिम चरणात लोक मोठया संख्येने देखावे दर्शनासाठी बाहेर पडतील. रस्ते माणसांनी भरून जातील. सार्वजनिक उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा मोठाच ताण सरकार, म्हणजे पर्यायाने पोलीस यंत्रणेवर असतो. उत्सवी वातावरणाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये अशीच सर्वांची अपेक्षा असणे स्वाभाविकच. त्याची पूर्वतयारी म्हणून स्थानिक स्तरावर शांतता समितीच्या बैठका पोलीस घेतात. समाजातील प्रभावी व्यक्तींच्या भेटीगाठी घेतात. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद ठेवावा असा आग्रह धरला जातो. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने याकामी लोकसहभाग वाढवणारा स्वयंस्फूर्त पुढाकार घेतला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील सुमारे १ लाख कार्यकर्त्यांची गणसेवक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांना आवश्यक तितके पोलीस प्रशिक्षण देण्याचेही त्यांनी ठरवले आहे. पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करण्याचा उद्देश असल्याचे संबंधितांनी माध्यमांना सांगितले. नाशिकसह सर्वच जिल्ह्यांमध्ये पोलीस मित्र नेमण्याचे स्थानिक यंत्रणेने जाहीर केले आहे. सार्वजनिक उत्सव शांततेत पार पडावेत ही सगळी यातायात सुरु असणार. त्यासाठी प्रयत्नशील असणे हे सरकारचे कर्तव्यच. तथापि लोकांनीही सामाजिक भान राखणे गरजेचे आहे. नव्हे ती त्यांची जबाबदारी देखील आहे. सार्वजनिक कार्य्रक्रमांबाबत लोकभावना संवेदनशील झाल्या असाव्यात का, असा प्रश्न जाणत्यांना पडतो. त्यामुळेही सामूहिक जबाबदारीचे भान रुजणे अत्यावश्यक झाले आहे.

वर उल्लेखिलेले उपक्रम ती जाणीव वाढवण्यासाठी पूरक ठरू शकतील. सामाजिक भान कासवाच्या गतीने का होईना वाढत असल्याचे पदचिन्हे दिसू लागली आहेत. सामाजिक एकोपा राखण्यासाठी लोक एकत्र येत आहेत. उत्सव पर्यांवरण पूरक साजरा करण्याकडे कल वाढत आहे. लोक पीओपीच्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्तींना प्राधान्य देत आहेत. सजावटही पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न आढळतो. गणेशमूर्ती दान करणे, निर्माल्य कलशात टाकण्याचा संस्कार रुजत आहे. उत्सवांना आवाजी स्वरूप येऊ नये असे युवा पिढीलाही काही प्रमाणात वाटत आहे. गणेश बुद्धीची देवता आहे. उत्सवांचा मूळ उद्देश अबाधित ठेवून उत्सव साजरे करण्याची बुद्धी तो लोकांना प्रदान करेलच.

- Advertisment -

ताज्या बातम्या