महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक मुद्दे गृहित धरण्याची परंपराच जणू समाजात रुजली आहे. मासिक पाळी हा त्यातीलच एक गंभीर विषय. मासिक पाळीचे चक्र सुरु झालेल्या जगातील कोट्यवधी स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान आरोग्याच्या समस्या भेडसावतात, असा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष माध्यमात प्रसिद्ध झाला आहे. मासिक पाळी हे नैसर्गिक-शारीरिक आणि महिलांच्या प्रजननक्षमतेशी संबंधित संवेदनशील चक्र. तथापि कोणत्याही कारणांमुळे हे चक्र बिघडले तर त्याचा थेट परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. तरीही या विषयावर समाजात अजुनही मनमोकळी चर्चा अभावानेच आढळते. किंबहुना हा विषय गोपनीयच ठेवला जातो. चारचौघात नव्हे तर चारचौघीतही या विषयावर संवाद साधायला महिला कचरतात. याविषयी गैरसमजच जास्त आढळतात. अनेक महिला यादिवसात सॅनिटरी पॅड्सवापरतात. त्याचा काही महिलांना त्रास होऊ शकतो. त्यावर जळगाव शहरातील झाशीची राणी महिला बचत गटाने अभिनव उपाय शोधला आहे. या महिला केळीच्या खोडापासून सॅनिटरी पॅड बनवतात. मशिन्सच्या सहाय्याने त्यासाठीची सगळी प्रक्रिया महिलाच पार पाडतात. केळीच्या एका खोडापासून साधारणत: दोन किलो पेपर तयार होतो. त्यापासुन साधारण 50 ते 55 पॅड्स तयार होतात. असे दिवसाला चार हजार पॅड्सचे उत्पादन केले जाते. पर्यारवरणपूरक हे पॅड्स नष्ट व्हायला तुलनेने कमी वेळ लागतो असे या महिलांनी माध्यमांना सांगितले. या उद्योगाने वीस महिलांना रोजगार दिला आहे. बचतगटाला नाबार्डने अर्थसहाय्य केले आहे. मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्समुळे अनेकींचा तो त्रास कदाचित कमी होऊ शकेल. मासिक पाळी दरम्यानच्या आरोग्य आणि स्वच्छतेसंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करतात. त्यामुळे पॅड्स वापरण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. राज्य सरकारेही महिलांना सवलतीच्या दरात पॅडस उपलब्ध करुन देणार्या योजना जाहीर करतात. तथापि वापरलेल्या पॅड्सची विल्हेवाट कशी लावायची, त्याचा कचरा कुठे आणि कसा फेकायचा ही समस्या महिलांना सतावते. पॅड्स बनवताना काही प्रमाणात प्लास्टिक वापरले जाते. ते नष्ट व्हायला अनेक वर्षे लागू शकतात. पॅड्स नष्ट करण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते थेट कचर्यात फेकले जातात. त्यामुळे कचरावेचकांच्याही आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावते असे पर्यावरण दक्षता मंचच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना सांगितले. सॅनिटरी पॅड्चा वापर आणि ते नष्ट करण्याची पद्धत यावर जनजागृतीचे प्रयत्न सरकारे आणि सामाजिक संस्था करत आहेत. जळगावच्या बचत गटाने इको फ्रेंडली पॅडस बनवून या समस्येवर त्यांच्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांनी महिलांचे प्रश्न समजावून घेतले तर त्यावर उत्तर शोधण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात हे त्या महिलांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून दिले आहे. त्यापासून महिलांचे बचत गट प्रेरणा घेतील आणि महिलांच्या सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतील अशी आशा करु या.