Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखस्वातंत्र्यासह महिला सक्षमीकरणाची संधी

स्वातंत्र्यासह महिला सक्षमीकरणाची संधी

आज १५ ऑगस्ट. देश स्वात्रंत्र्य दिवस मोठया उत्साहात साजरा करत आहे. कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, संरक्षण ही राष्ट्रीय विकासाची प्रमुख क्षेत्र मानली जातात. या क्षेत्रामंध्ये भारताची दमदार वाटचाल सुरु आहे असे जगभरातील तज्ञांचे मत आहे. देशासह जगाचे लक्ष चांद्रयान-३ कडे लागले आहे. ही मोहीम अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. आजचा दिवस देखील मराठी मुलखाच्या गावखेड्यातील शेकडो मातांच्या आयुष्यात एक नवे वळण आणणारा ठरू शकेल. या महिला त्यांच्या गावात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रमात भाषण करणार आहेत. भाषण करण्याची कदाचित अनेकांची ती पहिलीच वेळ असू शकेल. ही संधी मातांना केंद्र सरकारच्या निपुण भारत योजनेने मिळवून दिली आहे. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत गावोगावी मातांचे गट तयार करण्यात आले आहेत. गटाची एक प्रमुख देखील नेमली गेली आहे.

या योजनेंतर्गत गटातील महिलांच्या मोबाईलवर शिक्षणाशी संबंधित रोज एक व्हिडिओ पाठवला जातो. तो बघून त्या महिलांनी त्यांच्या मुलांना घरी शिकवणे अपेक्षित आहे. आज होणाऱ्या कार्यक्रमात गटप्रमुख महिला त्यांच्या भाषणात या योजनेचा लेखाजोखा मांडतील. मुलांचे शिक्षण शाळेच्या चार भिंतींपुरते मर्यादीत नाही. त्यापलीकडेही मुले अनेक प्रकारे शिकतात. त्यासाठीचे वातावरण मुलांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे याची जाणीव समाजाला काही प्रमाणात तरी झाली असावी. प्रयोगशील शिक्षक आणि सुजाण पालक मूल्यशिक्षणाचे अनेक प्रयोग राबवताना आढळतात. ते प्रयोग मुलांनी प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी घरातील वातावरण पूरक असायला हवे. ती वातावरण निर्मिती यानिमित्ताने व्हावी असाही एक उद्देश असावा का? शिक्षणपद्धतीत पालकांचा, विशेषतः मातांचा सहभाग मोलाचा आहे. मुलांवर संस्कार करण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्या अभ्यास करून घेण्याची जबाबदारी विशेष करून महिलांची आहे अशी समाजमान्यता आढळते. जाणत्यांना समाजात मूल्यांचा अभाव जाणवतो. मुलांमध्ये मूल्यांची रुजवण कमी होत आहे हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. त्याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम समाज अनुभवत आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग वाढत आहे. क्रोध अनावर होत आहे. किरकोळ कारणांवरून मुले त्यांच्याच मित्रांचा जीव घ्यायलाही कचरत नाहीत. आदर, आपुलकी, साहचर्य, सहकार्य, जिव्हाळा, संवेदनशीलता आढळत नाही. पालक आणि मुलांमध्ये संवादाचा अभाव हे याचे एक प्रमुख कारण मानले जाते. तो संवाद पुन्हा एकदा दृढ करण्याची संधी उपरोक्त प्रयोग उपलब्ध करून देऊ शकेल. त्याचा उपयोग कुटुंब शिक्षणासाठी देखील होऊ शकेल. आई शिकली तर घर शिकते असे म्हंटले जाते. यातून महिलांचे देखील सक्षमीकरण घडू शकेल. सगळ्याच माता साक्षर असतीलच असे नाही. तथापि व्हीडियोच्या माध्यमातून ती उणीव दूर होऊ शकेल. माता निरक्षर आहेत हा न्यूनगंड सर्वांच्याच मनातून काढला जाऊ शकेल. मुलांचा अभ्यास घेण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी आपणही सक्षम आहोत ही भावना मातांच्या मनात निर्माण होऊ शकेल. त्यासाठी गटप्रमुख मातांना आणि समाजाला देशाच्या स्वातंत्र्यदिवसाच्या शुभेच्छा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या