अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर दक्षिण मतदार संघाच्या निवडणुकीच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामापर्यंत त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा भेदून अनाहुत व्यक्ती पोहोचल्याची धक्कादायक माहिती निवडणूक रिंगणातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याद्वारे दिली गेली आहे. यासंदर्भातील व्हीडीओही त्यांच्याद्वारे व्हायरल झाला असून, सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करणारा लंके यांच्या यंत्रणेने रंगेहात पकडला व काय करतेय महसूल व पोलिस यंत्रणा, असा सवालही केला आहे.
याबाबत लंके समर्थकांकडून माहिती देण्यात आली आहे. नगर दक्षिण मतदार संघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना एक बेकायदेशीर व्यक्ती निलेश लंके प्रतिष्ठानच्या यंत्रणेने रंगेहात पकडली. सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न लंके यांच्या समर्थकांनी हाणून पाडला. केंद्र, राज्य व स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता, त्यांची परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटर जवळ जातेच कशी?, असा सवाल त्यांनी केला आहे. पालक मंत्री विखे हे प्रशासनावर दबाव आणत आहेत, की प्रशासनच झोप घेतल्याचे सोंग करत आहे? सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा दावाही त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
अनाहुत व्यक्ती सीसीटिव्ही डिव्हाईस जवळ गेली, त्यावेळी कोणीही सुरक्षा रक्षक सोबत नव्हता. त्यावेळी सैन्य दलाचा सुरक्षा रक्षक असणे बंधनकारक होते, असे लंके समर्थकांचे म्हणणे आहे. रात्री आठ वाजून 22 मिनिटांनी अचानक एक व्यक्ती या ठिकाणी आला. पोलिस व सीआरपी सुरक्षा यंत्रणा कोणतीही कल्पना न देता या ठिकाणी आलाच कसा? त्याच वेळेस तिथे उपस्थित असणार्या निलेश लंके प्रतिष्ठान कार्यकर्त्यांना ही घटना समजली. त्यांनी ताबडतोब हा व्यक्ती कोण आहे, अशी पोलिसांना विचारणा केली. त्यावेळेस त्यांना सुद्धा ह्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नव्हती. त्या अज्ञात व्यक्तीने सांगितले की, मला फक्त कलेक्टर साहेब विचारतील तुझं काय काम आहे? बाकी कोणाचा काही संबंध नाही.
मी टेक्निकलचा माणूस आहे. दरम्यान, उमेदवार लंके यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. संरक्षणव्यवस्था थोडे उठा, माणूस गोदामापर्यंत आलाय… काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकार्यांनी तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात, मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय… लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतंय….असे भाष्य त्यांनी यात केले आहे.
‘सीसीटीव्ही’मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तथ्यहीन
‘ईव्हीएम’ ठिकाणच्या व्हायरल व्हिडिओवरून जिल्हाधिकार्यांचा निर्वाळ
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर लोकसभा मतदारसंघाचे ‘ईव्हीएम’ मशीन ठेवलेल्या ठिकाणी, त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था भेदून एका अनाहूत व्यक्तीने प्रवेश करत, ‘सीसीटीव्ही’मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा देत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी व्हिडिओत दिसणारी ‘ती’ व्यक्ती देखभाल दुरूस्तीसाठी नियुक्त केलेला अधिकृत पुरवठादारच होता व त्याच्या समवेत केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही उपस्थित होते, असे स्पष्ट केले आहे.
मतदान झालेले ‘ईव्हीएम’ मशीन एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात सीलबंद करण्यात आले आहेत. त्या भोवती 61 सीसीटीव्ही कॅमेरे, केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल व स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय व्यवस्था नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्हीचे चित्रिकरण पाहण्यासाठी स्क्रीन उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात आला आहे. उमेदवार लंके यांच्या प्रतिनिधींनी याच स्क्रीनवरून सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ बनवून तयार केली व सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेली अनाहूत व्यक्ती छेडछाड करण्यासाठीच आली आहे, असा दावा करत निवडणूक यंत्रणा व पोलिसांवर आरोप केले होते. त्यांनी निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली होती. लंके यांच्या दाव्याने खळबळ निर्माण झाली होती. परंतु जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सालीमठ यांनी उमेदवार लंके यांचा दावा वस्तुस्थितीनुसार नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
यासंदर्भात माहिती देताना सालीमठ यांनी सांगितले की, ‘ईव्हीएम’ मशीन ठेवलेल्या सुरक्षा कक्षाच्या ठिकाणी सीसीटीव्ही तसेच सुरक्षा व्यवस्थेची दैनंदिन देखरेख करण्याकरता वरिष्ठ अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मंगळवारी सायंकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांची नेमणूक होती. रात्री 7.54 वा. मतमोजणी हॉलच्या एका कॅमेर्याचे ’लूज कनेक्शन’ असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार शेळके यांनी रात्री 8.15 वाजता पुरवठादार अजिनाथ शिवाजी मुळे (स्वामी इंटरप्राईजेस) यांना सीसीटीव्ही व अनुषंगिक उपकरणांची तपासणी करण्याकरता कळवले होते. त्यानुसार पुरवठादार मुळे यांनी तेथे उपस्थित असलेल्या सीआरपीएफ सुरक्षारक्षकांना याबाबत पूर्वकल्पना दिली होती. सीआरपीएफ रक्षकांच्या नोंदवहीमध्ये सुरक्षाकक्षात प्रवेश करण्याबाबत 8.20 वाजता नोंद केली होती. तदनंतर दोन सीआरपीएफ रक्षकांसोबत मुळे यांनी मतमोजणी हॉलच्या कॅमेर्याची तपासणी केली त्यानंतर 8.25 वाजता तेथून निघताना पुन्हा सीआरपीएफच्या नोंदवहीमध्ये नोंद केलेली आहे.
‘ईव्हीएम’ ठेवलेल्या सुरक्षाकक्षाचे कोणतेही कॅमेरे आता नादुरूस्त नसून ते सुरळीत काम करत आहेत. सुरक्षा कक्षाबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना करण्यात आली असून त्याबाबत कोणतीही कमतरता राहिलेली नाही. त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा नियमानुसार कार्यरत असून सर्व सुरक्षारक्षक कर्तव्यावर दक्ष आहेत.
- सिध्दाराम सालीमठ, जिल्हाधिकारी