पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
राज्य सरकारच्या आनंदाचा शिधा योजनेत 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाथर्डी तहसील कार्यालयात काम करणार्या खाजगी व्यक्ती विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वस्त धान्य वितरक अर्जुन मारुती शिरसाट यांनी काकासाहेब महादेव सानप (रा. शिरसाटवाडी) याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मार्च ते डिसेंबर 2023 पर्यंत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात काम करणारा खाजगी व्यक्ती काकासाहेब सानप याच्याकडे तालुक्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदरांनी तत्कालीन तहसीलदार, तालुका पुरवठा अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्या सांगण्यावरून रक्कम जमा केली. शिरसाट यांनी त्यांच्या तीन आनंदाचा शिधा संचाची अंदाजे रक्कम पंचेचाळीस हजार 214 रुपये हे काकासाहेब सानप यास ऑनलाईन पध्तीने जमा केले.
मात्र सानप याने त्या रक्कमा शासनास जमा न करता स्वतःकडे ठेवून तालुक्यातील इतर सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानादार यांची अंदाजे 50 लाख रुपयाची फसवणूक केली आहे. गुढीपाडवा, गौरी गणपती व दिवाळी या सणासाठी राज्य शासनाने आनंदाचा शिधा लोकांना दिला होता. सानप याच्याकडे तालुक्यातील जवळपास 150 धान्य दुकानदारांनी शासकीय खात्यात भरणा करण्यासाठी पैसे दिले होते. मात्र, ते त्यांनी भरलेच नाहीत. सर्व दुकानदारांची रक्कम 50 लाखांच्यापुढे असण्याची शक्यता फिर्यादीत वर्तवली आहे. सानप याने ही सर्व रक्कम शासनाला भरणे अपेक्षित होते. मात्र, त्याने ते पैसे भरले नसून त्या शासनाच्या पैशावर डल्ला मारला आहे. प्रत्येक धान्य दुकानदारांना पैसे जमा करण्याचे आदेश सानप याने पुरवठा शाखेमार्फत काढले होते.
सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सानप याच्या नंबरवर पैसे भरल्याचे पुरावे आहेत. त्यामध्ये लाखो रुपये दुकानदारांनी चलनाद्वारे भरल्याचे दिसून येते. सानप खाजगी कंपनीमार्फत काम करत असल्याचे पुरावे असून त्याची नियुक्ती महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी पध्दतीने मानधनावर क्लार्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटरपदी करण्यात आली होती. परंतु सानप हा रोजगार हमी शाखेत काम न करता, पुरवठा शाखेमध्ये पुरवठा निरीक्षक यांच्या हाताखाली सुमारे 2021 पासून कार्यरत आहे. दुकानदारांची चलन भरणे, रेशनकार्ड ऑनलाईन करून देणे, इत्यादी कामे करत होता. तसेच पाथर्डी तालुका दुकानदार नावाने पुरवठा निरीक्षक यांनी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड होता. आता पोलीस पुढे कशा पद्धतीने तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.