शिवडे | वार्ताहर Shivde
शिवडे-बोरखिंड शिवारात बदोशी मळा परिसरात आज (दि. २१) सकाळी ८ वा. एका शेतकर्यावर बिबट्याने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. प्रसंगावधान, धाडस आणि पाळीव कुत्र्याच्या सतर्कतेमुळे शेतकरी थोडयात बचावल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर शिवडे, बोरखिंड आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पांडु लक्ष्मण निरगुडे (३५) हे आपल्या शेतात नियमितप्रमाणे गवत कापण्यासाठी गेले होते. सकाळची वेळ असल्याने परिसरात शांतता होती. शेतात उभ्या असलेल्या मक्याच्या दाट पिकामध्ये हालचाल जाणवताच त्यांनी त्या दिशेने पाहिले असता अचानक एक बिबट्या बाहेर आला आणि त्याने त्यांच्या दिशेने झेप घेतली. अचानक समोर आलेल्या बिबट्याला पाहून काही क्षण निरगुडे हादरले. मात्र, त्यांनी धीर न सोडता मोठमोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांच्या सोबत असलेल्या पाळीव कुत्र्यानेही मालकावर संकट आल्याचे ओळखून बिबट्याच्या दिशेने जोरदार भुंकत प्रतिकार केला.
मनुष्य आणि कुत्र्याच्या या दुहेरी प्रतिकारामुळे बिबट्या काही काळ गांगरला. त्यानंतर बिबट्या काही वेळ निरगुडेंपासून काही अंतरावर थांबला आणि नंतर जवळील झाडावर चढून बसला.

ही माहिती परिसरात वार्यासारखी पसरताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने काही वेळानंतर बिबट्याने झाडावरून उतरून जवळच्या झुडपांकडे धूम ठोकली.
या घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला शेतमजूर, लहान मुले आणि सकाळ-संध्याकाळ शेतात जाणारे मजूर धास्तावले आहेत. दरम्यान, वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने पाहणी करावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
वनव्यांमुळे जंगल भस्मसात…
शिवडे परिसरातील वनक्षेत्रात अलीकडे लागलेल्या वनव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगल भस्मसात झाले आहे. परिणामी वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून अन्न आणि सुरक्षित आश्रयाच्या शोधात बिबटे आता मानवी वस्तीजवळ व शेतीकडे वळत आहेत. विशेषतः मका, बाजरी आणि ऊस यांसारखी उंच पिके बिबट्यांसाठी सुरक्षित लपण्याची जागा ठरत असल्याने त्यांचा वावर शेतीभागात वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत शिवडे, बोरखिंड, दोडी परिसर व काही शिवारांमध्ये वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. रात्रीच्या वेळी कुत्र्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्याच्याही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे.




