Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंध...आणि आम्ही सुटलो !

…आणि आम्ही सुटलो !

शिरीन पाठारे, सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक, एअर इंडिया Shirin Pathare, Assistant Managing Director, Air India

अफगाणिस्तान Afghanistan धगधगतोय. तालिबानने Taliban उच्छाद मांडला आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या प्रत्येक परदेशी नागरिकाला मातृभूमीची ओढ लागली आहे. जगभरातील देश आपापल्या नागरिकांची सुटका करण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतही आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायभूमीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. इथल्या नागरिकांचे अनुभव थरारक आहेत. एअर इंडियाचे

- Advertisement -

शिरीन पाठारे यांनी व्यक्त केलेले मनोगत त्यांच्याच शब्दात…

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच काबूलमध्ये दाखल झालो. काबूल विमानतळावरून उड्डाण करणार्‍या एअर इंडियाच्या विमानांच्या प्रमुख सुरक्षा अधिकार्‍याचे अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद मला देण्यात आले होते. त्यावेळी काबूलमधले वातावरण थंड होते. पर्वतांची हिमाच्छादित शिखरे खुणावत होती. इथली माणसे प्रेमळ होती आणि एअर इंडियाचा कर्मचारी असल्यामुळे माझ्यासाठी सगळे काही उत्तम होते.

दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडत होत्या. अमेरिकन फौजा मेअखेरीपर्यंत अफगाणिस्तान सोडणार असल्याची वार्ता येऊन थडकली होती. अफगाणिस्तानमधल्या अपहरणाच्या वाढत्या घटनांमुळे यंदा फेब्रुवारी महिन्यात भारतीय वकिलातीकडून अज्ञात आणि असुरक्षित ठिकाणी प्रवास न करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी बाहेर न पडण्याचीही ताकीद देण्यात आली होती.

ऑगस्टअखेरीपर्यंत अमेरिकन फौजा अफगाणिस्तान सोडणार असल्याचे बायडेन प्रशासनाने जाहीर केले आणि इकडे तालिबानच्या हिंसाचाराला ऊत येऊ लागला. मे महिन्यात तालिबानने कंदाहारला घेराव घातला. शहरात जाण्याचे सगळे मार्ग बंद केले. यामुळे तिथल्या अफगाण फौजांना अन्नधान्याची कमतरता भासू लागली आणि अखेर त्यांना तालिबानपुढे शरणागती पत्करावी लागली. तालिबान पुढे येत होता. त्यांनी मजार-ए-शरीफवर कब्जा केला. आता काबूल त्यांच्या दृष्टिपथात आले होते. मजार-ए-शरीफपासून अवघ्या 425 किलोमीटरवर असणार्‍या काबूलवर पुढच्या काही दिवसांमध्ये तालिबानी झेंडा फडकणार होता.

29 जुलैला वडिलांचे निधन झाल्यामुळे मी मुंबईला आलो. सगळे विधी पार पडल्यानंतर 12 ऑगस्टला काबूलला परतलो. ‘तू परत आलासच का? ’असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. त्यावर काबूलला परतणे हे माझे कर्तव्य होते. मी परत आलो नसतो तर काबूलमधल्या एअर इंडियाच्या विमानांची जबाबदारी कोणी घेतली असती, असा प्रतिप्रश्न मी केला. काबूल विमानतळावरून सुटणारी 13 आणि 14 ऑगस्टची एअर इंडियाची विमाने खच्च भरली होती. 15 ऑगस्ट… भारताचा स्वातंत्र्यदिन…मी कुटुंबियांना फोन करून शुभेच्छा दिल्या. सकाळी अकरा वाजता घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या सहकार्‍याने तालिबान काबूल विमानतळापासून अवघ्या 11 किलोमीटरवर असल्याची बातमी दिली. त्या दिवशी मी पासपोर्ट सोबत घेतला नव्हता. जवळ पासपोर्ट असता तर मी पंधरा ऑगस्टलाच भारतात परतलो असतो. मी त्या दिवशी घर सोडताना पासपोर्ट सोबत का घेतला नाही, हा प्रश्न अजूनही मला छळत असतो.

15 ऑगस्टचे एअर इंडियाच्या एआय 244 काबूल ते दिल्ली विमानातील सगळी आसने आरक्षित होती. एकूण 160 प्रवासी प्रवास करणार होते. मात्र फक्त 35 प्रवाशांनीच चेक इन केल्याची बाब माझ्या लक्षात आली. मात्र हळूहळू प्रवाशांची संख्या वाढू लागली. काहीकाळात अन्य 100 प्रवासी दाखल झाले. मी राहत असलेल्या इमारतीला तालिबानने वेढा घातल्याचा व्हिडिओ एका सहकार्‍याने दाखवला. मला घाबरून चालणार नव्हते. मी सुरक्षा अधिकारी होतो. प्रवाशांना धीर देणे आवश्यक होते.

मी सगळ्या कर्मचार्‍यांना मोबाईल बंद करायला सांगितले. विमानातले 31 प्रवासी काबूल विमानतळावर पोहोचू शकले नव्हते. मी फ्लाईट कमांडरला परिस्थितीची कल्पना दिली. त्याने पासपोर्टशिवाय अफगाणिस्तान सोडण्याचा सल्ला दिला. मी स्पष्ट नकार दिला. जशी तुमची इच्छा, असे म्हणून तो निघून गेला. माझा देवावर विश्वास होता. त्यावेळी कतार एअरवेजचे एक आणि पाकिस्तान एअरलाईन्सची दोन विमाने धावपट्टीवर ताटकळत उभी होती. त्यांना उड्डाणासाठी हिरवा कंदील मिळत नव्हता.

300 प्रवाशांना घेऊन निघालेले कतार एअरवेजचे विमान जवळपास तीन तास धावपट्टीवर उभे होते. सुदैवाने सायंकाळी साडेचार वाजता एअर इंडियाच्या विमानाला काबूल विमानतळावरून उड्डाण करण्याची संधी मिळाली. ते त्या दिवसाचे काबूल विमानतळावरून उड्डाण करणारे अखेरचे विमान होते. हे विमान आकाशात दिसेनासे झाले आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला.

या विमानाने आकाशात भरारी घेतली आणि तालिबानी सैनिकांनी काबूल विमानतळावर प्रवेश केला. अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. संध्याकाळचे पाच वाजले होते. कोणीही विमानतळ सोडू नका, असा संदेश येऊन धडकला. त्यातच आमच्या कारचा चालक पळून गेला होता. विमानतळावरचे आमचे मित्रही अवघ्या काही मिनिटांमध्ये परागंदा झाले होते. काहीच सुचत नव्हते. सुदैवाने मला विमानतळावर भारतीय वकिलातीचे प्रोटोकॉल अधिकारी भेटले. तेही अडकले होते. त्यांनी वकिलातीत फोन केला. एक बुलेटप्रूफ गाडी मिळवण्यात आम्हाला यश आले. आम्हाला विमानतळापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भारतीय वकिलातीत पोहोचायचे होते. मी चालकाला थेट वकिलातीत गाडी न्यायला सांगितले. विविध देशांच्या वकिलाती असणारा हा काबूलमधला अत्यंत सुरक्षित भाग. एरवी सुरक्षारक्षकांच्या गराड्यातला हा भाग आज सुनसान होता.

इथे एकही सुरक्षारक्षक दिसत नव्हता. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. सूर्य मावळतीला निघाला होता. मला पासपोर्ट हवा होता. त्यावर अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडच्या व्हिसाचे शिक्के होते. त्यामुळे पासपोर्ट मिळवणे भागच होते. मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय मित्राच्या मदतीने एक गाडीही मिळवली. सोबत तीन अफगाणी नागरिक घेऊन मी निघालो. सायंकाळी साडेसात वाजता मी इमारतीत शिरलो. तालिबानी सैनिक कोणत्याही क्षणी इमारतीत दाखल होण्याची शक्यता असल्याने शक्य तितक्या लवकर इथून निघून जा, असे घरमालकाने सांगितले. त्याने मला पंधरा मिनिटे दिली. मी बहुतांश सामान तिथेच सोडले. पासपोर्ट घेतला आणि गाडीत बसलो.

मन अगदी सुन्न झाले होते. नजर जाईल तिकडे तालिबानी दिसत होते. लोक घरातले सामान घेऊन रस्त्यावरून पळत होते. अत्यंत विदारक दृश्य होते. हा काय प्रकार आहे, असे मी विचारताच सोबतच्या अफगाणी नागरिकांनी मला गप्प बसण्याचा इशारा केला. मी मनोमन कुलदेवतेची प्रार्थना केली. माझे हृदय धडधडत होते. गाडी भारतीय वकिलातीकडे निघाली होती. मात्र कॅनडाच्या वकिलातीसमोर तालिबानी सैनिकांनी आमची गाडी अडवली. रात्रीचे साडेआठ वाजले होते. ती पंधरा माणसे होती. त्यांच्याकडे बंदुका आणि रॉकेट लाँचर्स होते. मी पाकिटातून बायको आणि मुलांचा फोटो काढला. हे त्यांचे अखेरचे दर्शन ठरू शकले असते. सोबतचे अफगाणी नागरिक हेच माझे अखेरचे आशास्थान होते.

त्यांच्या रूपात देवच धावून आला होता. त्यांनी तालिबान्यांसोबत बोलणी सुरू केली. अंधार असल्यामुळे तालिबान्यांना आमचे चेहरे दिसत नव्हते. त्यामुळे मी भारतीय असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. गाडी जवळपास 20 मिनिटे उभी होती. मी जीवन-मृत्यूच्या हिंदोळ्यावर शांत बसून होतो. कोणता श्वास अखेरचा असेल याची अजिबात कल्पना नव्हती. अफगाणी नागरिकांशी बोलत असताना एका तालिबान्याने हवेत गोळीबार केला. त्याक्षणी सगळे संपले, असे मला वाटून गेले. मग गाडीचा चालक खाली उतरला. त्याने तालिबान्यांशी बोलणे सुरू केले. सुदैवाने त्याच वेळी तालिबानच्या एका मोठ्या कमांडरचा ताफा त्या भागात येत होता. अचानक काय झाले कुणास ठाऊक… तालिबानी सैनिकाने पश्तू भाषेतला ‘बुरो’ असा शब्द उच्चारला. ‘बुरो’ म्हणजेच निघा. एकही क्षण वाया न घालवता चालकाने गाडी भारतीय वकिलातीच्या दिशेने नेली. हा शब्द मी कधीही विसरणार नाही.

आम्ही वकिलातीत पोहोचलो. मी रात्रीचे जेवण घेतले. झोपण्याचा प्रयत्न केला. पण डोळा लागत नव्हता. पुढे वाढून ठेवलेल्या संकटाची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. 16 ऑगस्टला आम्ही वकिलातीतच होतो. तालिबानने वकिलातीला वेढाच घातला होता. त्यामुळे कोणी वकिलातीच्या बाहेर जाऊ शकत नव्हते आणि कोणी आतही येऊ शकत नव्हते. त्या दिवशी 150 भारतीय वकिलातीत होते. तालिबानने आम्हाला बंदिवासात टाकले होते. अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन होईपर्यंत आम्हाला काबूल सोडता येणार नाही, असेच वाटत होते. 16 ऑगस्टच्या रात्री साडेनऊ वाजता तालिबानचा संदेश येऊन थडकला. ते आम्हाला काबूल विमानतळापर्यंत सोडणार होते. जीवात थोडा जीव आला. दहा वाजेपर्यंत आम्ही सर्वजण तयार झालो.

20 लँडक्रूझर्समधून 150 भारतीयांना नेले जात होते. भारतीय वकिलातीपासून काबूल विमानतळापर्यंतचे अंतर अवघ्या 20 मिनिटांचे. पण त्या रात्री तिथे पोहोचायला आम्हाला पाच तास लागले. अशा प्रवासाची मी कधी कल्पनाही केली नव्हती. रस्त्यावर गर्दी होती. अफगाणी नागरिक आमच्या ताफ्याजवळ येताच तालिबानी हवेत गोळीबार करत होते. रात्री दोननंतर आम्ही काबूल विमानतळावर पोहोचलो. नेहमीच्या प्रवेशद्वाराजवळ अफगाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. विमानतळ बंद असल्यामुळे त्यांना आत जाता येत नव्हते. आम्ही टर्किश प्रवेशद्वाराजवळ उतरलो. तालिबान्यांनी आम्हाला तुर्की सैनिकांच्या हवाली केले. त्यांनी आमची तपासणी केली आणि अमेरिकन सैनिकांच्या ताब्यात दिले. अमेरिकन सैनिकांनी कसून तपासणी केल्यानंतर आम्हाला धावपट्टीकडे नेले.

पहाटे साडेतीन वाजता आम्ही अमेरिकन वायुदलाच्या काबूल विमानतळावरील तळावर दाखल झालो. पहाटे चार वाजता भारतीय वायुदलाचे विमान काबूल विमानळावर उतरले. आम्ही विमानात चढायला सुरुवात केली. सकाळी सहापर्यंत सर्व भारतीयांना काबूल विमानतळ सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. आमच्या विमानाने काबूल विमानतळावरून उड्डाण केले. त्यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले. जिवंतपणी इथून बाहेर पडणे हीच मोठी बाब होती. आम्हाला तिथून बाहेर काढणार्‍या भारत सरकारचे आणि त्यांच्या नियोजनाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने रणनीती आखून आम्हाला तालिबान्यांच्या तावडीतून सोडवले.

आमचे विमान ताजिकिस्तान, इराणच्या आकाशातून उडत होते. सकाळी साडेअकरा वाजता आमचे विमान गुजरातमधल्या जामनगर विमानतळावर उतरले. वैमानिकाने विमान जामनगर विमानतळावर उतरण्यासाठी तयार असल्याचे सांगितल्यावर ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा’ हे शब्द माझ्या मनात तरळून गेले. विमान धावपट्टीवर थांबले. मी खाली उतरलो. भारतीय भूमीवर पाय ठेवला. माझ्या भावना उचंबळून आल्या होत्या. मी माझ्या देशात सुरक्षित परतलो होतो. मी या पवित्र भूमीवर डोकं टेकवले. मातृभूमीचे चुंबन घेतले. त्याक्षणी मी भरून पावलो होतो. माझा भारत, माझा प्रिय देश हेच शब्द तोंडून बाहेर पडत होते..

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या