मुंबई | प्रतिनिधी Mumbai
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri East by-election ) गुरुवारी सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी येत्या ६ नोव्हेंबरला होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याने ही निवडणूक शिवसेनेसाठी औपचारिकता मानली जात आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीस म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के; सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.
२५६ मतदान केंद्रांपैकी मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे मतदान केंद्र क्रमांक ५३ मध्ये सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्रांमध्ये एकूण १,४१८ मतदारांमध्ये ७२६ महिला मतदार असल्याने आणि महिला मतदारांची ही संख्या सर्वाधिक असल्याने या ठिकाणीच सखी मतदान केंद्र तयार करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.