Tuesday, July 28, 2026
HomeनगरAhilyanagar : अंगणवाड्यांना शोधावी लागणार झेडपी शाळांच्या आवारात जागा

Ahilyanagar : अंगणवाड्यांना शोधावी लागणार झेडपी शाळांच्या आवारात जागा

येत्या शैक्षणिक वर्षापासून नवा निर्णय लागू || नगर जिल्ह्यात दीड हजारांहून जागांसाठी शोधाशोध

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांचा वापर अंगणवाड्यांसाठी केला जाणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाच्या यू डायसवर उपलब्ध झालेल्या माहितीनूसार नगर जिल्ह्यातील 3 हजार 531 शाळांपैकी 1 हजार 938 शाळांमध्ये अंगणवाडी सुरू आहेत. तर उर्वरित 1 हजार 593 शाळांमध्ये अंगणवाडी सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध आहे की नाही, याची माहिती तात्काळ उपलब्ध करण्याच्या सुचना तालुका पातळीवर देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार बालवाडी, अंगणवाडी आणि प्राथमिक शिक्षण एकत्रित पद्धतीने देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. राज्यात सध्या सुमारे 1 लाख 10 हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत. त्यातील अनेक अंगणवाड्या इमारतीत भाडे तत्वावर, अपुर्‍या सुविधांमध्ये सुरू आहेत. यामुळे आता ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी अंगणवाडीचे वर्ग भरवले जाणार आहेत. गावागावांमध्ये शाळा आणि अंगणवाडी वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने मुलांना आणि पालकांना अडचणी येत होत्या. नवीन निर्णयामुळे लहान मुलांना शाळेच्या वातावरणाची सवय लवकर लागणार असून प्राथमिक शिक्षणात जाण्याचा संक्रमण काळही सोपा होणार आहे.

काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध नाहीत. तर काही ठिकाणी अंगणवाड्या आणि शाळा एकमेकांपासून दूर आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी हा निर्णय लगेच लागू करणे शक्य होणार नाही. अंगणवाडीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, खेळण्यांची जागा आणि लहान मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. राज्यातील सुमारे 42 हजार अंगणवाड्या शाळांच्या परिसरात आहेत. पूर्वप्राथमिक आणि इयत्ता पहिलीचा वर्ग एकाच ठिकाणी असणे योग्य असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध आहेत, तेथे अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.

ज्या शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणीच अंगणवाडी वर्ग स्थलांतरित केले जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक वातावरणावर भर दिला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शिक्षण विभागाच्या यू डायसवर उपलब्ध झालेल्या माहितीनूसार नगर जिल्ह्यातील 3 हजार 531 शाळांपैकी 1 हजार 938 शाळांमध्ये अंगणवाडी सुरू आहेत. तर उर्वरित 1 हजार 600 ठिकाणी शाळांच्या आवारात अंगणवाड्यांना जागा उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती तात्काळ शिक्षण विभागाला सादर करण्याच्या सुचना जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.

बोलकी आकडेवारी
नगर जिल्ह्यात 5 हजार 375 अंगणवाड्या सुरू असून त्यातील 4 हजार 128 ठिकाणी अंगणवाड्यांना स्व इमारती आहेत. स्वत:ची इमारत नसलेल्या 1 हजार 247 अंगणवाड्या असून यातील अवघ्या 267 अंगणवाड्या या प्राथमिक शाळांमध्ये भरत आहेत. यासह 79 अंगणवाड्या या ग्रामपंचायतीत, 498 अंगणवाड्या या भाडोत्री जागेत तर 160 अंगणवाड्या या समाजमंदिरात भरतांना दिसत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सायबर फसवणुकीच्या पैशांचे ‘म्युल अकाउंट’धारक रडारवर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरातील सायबर फसवणुकीच्या रकमा स्वीकारण्यासाठी वापरल्या गेलेल्या ‘म्युल अकाउंट’ प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने पुढे सरकणार असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील 10 संशयित...