Tuesday, May 28, 2024
Homeनगर9 हजार अंगणवाडी सेविकांची होणार आरोग्य तपासणी

9 हजार अंगणवाडी सेविकांची होणार आरोग्य तपासणी

अहमदनगर | ज्ञानेश दुधाडे | Ahmednagar

जिल्ह्यातील आरोग्य सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका अशा 9 हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. राज्य सरकाराच्या महिला बालकल्याण आयुक्तालय यांनी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाला दिल्या असून त्यानुसार झेडपी आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही आरोग्य तपासणी मोहीम राबण्यात येणार आहे. यात महिलांमध्ये कॉमन आढळणार्‍या दहा आजारांची तपासणी करून त्यानुसार अंगणवाडी सेविकांना शासकीय आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य सल्ला देण्यात येणार आहे.

- Advertisement -

महिला बालकल्याण आयुक्तालय यांच्या सुचनेनुसार होणार्‍या या आरोग्य तपासणी मोहिमेमुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आरोग्य कुंडली तयार होणार आहे. तसेच तपासणीत आरोग्यविषयक तक्रारी आढळल्यास त्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारांचा सल्ला देण्यात येणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची एकत्रित दहा आराजांविषयी पहिल्यांदा तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. यातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याबाबत महिला बालकल्याण विभाग जागृत असल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागात बालकांसह, गरोदर माता यांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या, तसेच महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवणार्‍या, वेळप्रसंगी आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या तसेच शासनाच्या विविध योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करणार्‍या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा निर्णय महिला बालकल्याण आयुक्तालयाने घेतला आहे. यासाठी महिलांमध्ये कॉमन पध्दतीने आढळून येणारे दहा आजारे यांची तपासणी करण्यात येवून त्यावर उपचार आणि वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या महिमेमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे आरोग्य विषयक प्रबोधन होण्यासोबत आरोग्यविषय जागृती होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची मदत घेण्यात असून पुढील महिन्यांपासून या आरोग्य तपासणी मोहिमी आखणी करण्याचे काम सुरू आहे.

या आरोग्य तपासणीत अंगणवाडी सेविका, मदतनीस याचे हिमोग्लोबीन, रक्तदाब, लघवी, हृदय रोगाच्या तपासणीसाठी आवश्यक असणारी ईसीजी, गर्भाशय पिशवी कॅन्सर, स्तन अन्य प्रकारच्या कॅन्सरच्या स्वतंत्र तपासण्या, दातांची आरोग्य तपासणी, मुख कन्सर तपासणी आदी तपासण्यांचा समावेश आहे. या तपासणीत मोहिमसमोर येणार्‍या आजारांनूसार संबंधीतांवर शासकीय आरोग्य संस्था यांच्या मार्फत उपचार आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रात अंगणवाडी सेविकांना पाठवण्यात येणार असून त्या ठिकाणी उलपब्ध असणार्‍या तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, गरज असल्यास उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालात पुढील तपासण्या होणार आहेत. या आरोग्य तपासणीमुळे ग्रामीण भागात राबणार्‍या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची आरोग्य कुंडलीच तयार होणार आहे.

यांची होणार तपासणी

जिल्ह्यात 14 तालुक्यात महिला बालकल्याण विभागाचे 21 प्रकल्प कार्यरत असून यात अंगणवाडी सेविकांसोबत कंसात अंगणसाडी मदतनीस यांचा समावेश आहे. नगर ग्रामीण 221 (199), नगर ग्रामीण दोन 231 (215), नेवासा 164 (155), वडाळा 186 (180), श्रीगोंदा 217 (186), बेलवंडी 148 (129), पारनेर 193 (173), भाळवणी 147 (124), पाथर्डी 260 (253), शेवगाव 217 (164), संगमनेर 149 (121), घारगाव एक 178 (135), घारगाव दोन 150 (110), अकोले 277 (278), राजूर 201 (196), श्रीरामपूर 223 (167), राहुरी 311 (267), कर्जत 270 (207), जामखेड 177 (127), राहाता 295 (257), कोपरगाव 218 (205) असे आहेत. तसेच 129 पर्यवेक्षीका आणि 764 मिनीअंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या