श्रीरामपूर |प्रतिनिधी |Shrirampur
पोषण अभियन कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामांसाठी देण्यात आलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या अंत्यत निकृष्ट आहेत. त्यामुळे या मोबाईलचा वापर करताना सेविकांना अनंत अडचणी येत आहेत. 2019 मध्ये सेविकांना देण्यात आलेल्या या मोबाईलची वॉरंटी मे मध्येच संपली आहे.
त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आज दि. 17 ऑगस्टपासून आपापल्या प्रकल्प कार्यालयात जाऊन मोबाईल परत करणार आहेत. राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने हे सामूहिक मोबाईल वापसी आंदोलन होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनचे सरचिटणीस कॉ.राजेंद्र बावके यांनी दिली.
शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या या मोबाईलचा वापर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा, गर्भवती माता, पोषण आहाराचे वाटप आदी माहिती भरण्यासाठी करतात. मात्र या मोबाईलची क्षमता (रॅम) कमी असल्याने हे मोबाईल वारंवार हँग होतात. लवकर गरम होतात, त्यामुळे या मोबाईलवर सेविकांना काम करणे कठीण होते. सदर मोबाईलचा दर्जा निकृष्ट असल्याने त्यांच्या दुरूस्तीचा खर्च सुमारे 3 ते 8 हजारांपर्यंत होतो.
शासनाच्या वतीने मोबाईलच्या दुरूस्तीचा खर्च सेविकांकडूनच वसूल केला जातो. निकृष्ट दर्जामुळे सध्या सेविकांकडे असलेले हजारो मोबाईल बिघडलेले आहेत. 3 हजारांपेक्षा जास्त मोबाईल बंद पडलेले आहेत, अशी माहिती राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे नेते कॉ.बावके यांनी दिली.
तरी दि. 17 ऑगस्टपासून निकृष्ट दर्जाचे मोबाईल परत करण्याच्या आंदोलनात जिल्हातील सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, अध्यक्षा कॉ.मदिना शेख, सहचिटणीस कॉ.जीवन सुरूडे यांनी केले आहे.