जयपूर। Jaipur
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीतील मुंबई विरुद्ध उत्तराखंड सामन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईचा युवा सलामीवीर फलंदाज अंगकृष रघुवंशी क्षेत्ररक्षण करताना गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सामन्याच्या दुसऱ्या डावात ३० व्या षटकात ही दुर्घटना घडली. उत्तराखंडचा फलंदाज सौरभ रावत याने फिरकीपटू तनुष कोटियनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत असताना डीप मिड-विकेटला उभा असलेल्या अंगकृषने झेल पकडण्यासाठी धावत झेप घेतली. हा कठीण झेल पकडण्याच्या प्रयत्नात अंगकृष जमिनीवर जोरात आदळला. या धडकेत त्याच्या मानेला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली.
मैदानावर पडल्यानंतर अंगकृषला आपली मान हलवणे देखील कठीण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुंबईच्या फिजिओने तातडीने मैदानावर धाव घेतली. अंगकृषला स्वतःच्या पायावर उभे राहता येत नसल्याने अखेर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले आणि तेथून रुग्णवाहिकेने जयपूरमधील एस.डी.एम.एच. (SDMH) रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान श्रेयस अय्यर असाच झेल पकडताना जखमी झाला होता. श्रेयसच्या अनुपस्थितीत आता मुंबईचा दुसरा महत्त्वाचा खेळाडू अंगकृष रघुवंशी जखमी झाल्याने मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. अंगकृष हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळतो. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामापूर्वी तो फिट होतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
अंगकृषच्या दुखापतीच्या सावटाखाली मुंबईने या सामन्यात उत्तराखंडवर ५१ धावांनी शानदार विजय मिळवला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ३३१ धावांचे विशाल आव्हान दिले होते, ज्याचा पाठलाग करताना उत्तराखंडचा संघ २८० धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह मुंबईने स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. पहिल्या सामन्यात सिक्कीम विरुद्ध शतक झळकावणारा कर्णधार रोहित शर्मा मात्र या सामन्यात शून्यावर बाद झाला. दुखापतग्रस्त होण्यापूर्वी अंगकृषने ११ धावांचे योगदान दिले होते. अंगकृषच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी डॉक्टर त्याचे सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करत असून, त्याला सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.




