Tuesday, September 17, 2024
Homeनगरनिळवंडेचे पाणी कालव्यात सोडल्याने मराठवाड्यात संतप्त प्रतिक्रिया

निळवंडेचे पाणी कालव्यात सोडल्याने मराठवाड्यात संतप्त प्रतिक्रिया

राहाता । तालुका प्रतिनिधी

- Advertisement -

पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येचे निवारण व्हावे यासाठी १० आॅगस्ट २०२४ रोजी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते निळवंडे धरणाचे पाणी कालव्यात सोडण्यात आले. परंतु जायकवाडी ऐवजी निळवंडे पाणी कालव्यांना सोडल्याने मराठवाड्यातुन याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

पाणी सोडण्याची ही कृती जाणीवपूर्वक आणि बेपर्वाईने केली असुन समन्यायी पाणी वाटप तत्त्वाचे हे उल्लंघन असल्याने संबधित जलसंपदा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे पाणी हक्क कार्यकर्ते अभिजित धानोरकर यांनी म्हटले आहे. पंधरा आक्टोबर पुर्वी जायकवाडीच्या वरील भागातील कालव्यांना पाणी सोडु नये असे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे स्थायी आदेश असतांनाही निळवंडे धरणाचे पाणी कालव्यात सोडले यामागे जायकवाडीला गरज लागली तर पाणी मिळू नये हा उद्देश असल्याचेही धानोरकरांनी म्हटले आहे.

जायकवाडीच्या वरील भागातील लाभक्षेत्राला पावसाळी हंगामात कालव्यातून पाणी सोडुन चुकीचा पायंडा पाडला जात असून मराठवाड्यातील मोठ्या पाणी वापरकर्त्यांनी या गैरवर्तनुकीचा जाब विचारला पाहिजे, असे मराठवाडा विकास परिषदेचे सिंचन तज्ञ तसेच पश्चिमेचे २५ टिएमसी पाणी प्रथम प्राधान्याने मराठवाड्याला देण्याबाबतच्या १९ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी म्हणून संभाजीनगर उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र.५०/२०२२ दाखल करणारे याचिकाकर्ते शंकर नागरे यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : जायकवाडीची चिंता मराठवाड्यापेक्षा नगर-नाशिकला जास्त

नगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत सरासरी पावसाच्या जवळपास दीडपट पाऊस झाल्याने खरीप पिकांना पाण्याची गरज राहिलेली नाही आणि जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने जायकवाडीत पावसाळा सुरु होऊन अडीच महिने झाले तरी २९ टक्केच जिवंत पाणी असल्याचा मराठवाड्यात सुर आहे.

वास्तविक निळवंडे धरणातील पाणी कालव्यांना सोडल्याच्या पार्श्वभूमिवर मराठवाड्यातुन अशा नकारात्मक प्रतिक्रिया येणे अपेक्षित नाही. पंधरा ऑक्टोबर पुर्वी जायकवाडीच्या वरील भागातील कालव्यांना पाणी सोडु नये, असे कोणतेही स्थायी आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेले नाहीत. उलट प्राधिकरणाच्या निर्देश क्र.१० (अ) मध्ये प्रकल्पाच्या नियोजित खरीप पाणी वापरास मान्यता दिलेली असुन १५ ऑक्टोबर रोजी करावयाच्या समन्यायी पाणी वाटपात तो खरीप वापर हिशोबात घेण्याचे नमुद केलेले आहे.

तसेच खालील भागात होणाऱ्या परतीच्या पावसामुळे होणारी पाणी आवक विचारात घेऊन आक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पाणीसाठ्याचे समन्यायी पध्दतीने संनियंत्रण करण्याचे सुचित केले आहे. त्यामुळे आॅगस्ट मध्येच समन्यायी तत्त्वाचे हेतुतः आणि बेपर्वाईने उल्लंघन केले आणि त्यास जबाबदार असलेल्या जलसंपदा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी , अशा स्वरुपाचा प्रचार करणे वस्तुस्थितीला धरुन होणार नाही. जायकवाडी मध्ये १५ आक्टोबरला ६५ टक्क्यांपेक्षा कमी जिवंत पाणी साठा असेल तर जायकवाडी तसेच नगर-नाशिक मधील संबधित प्रकल्पात झालेला खरीपातील पाणी वापर हिशोबात घेऊन १५ ऑक्टोबरला समन्यायीच्या तत्त्वाने पाणी वाटप होणार आहेच. त्यामुळे याबाबत जनतेत संभ्रमावस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे यथोचित राहिल.

हे देखील वाचा : CM अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच!

जायकवाडीच्या वरील भागातील कालव्यांना पावसाळ्यात पाणी सोडु नये असे कुठेही नमुद नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी सोडल्याने वेगळा पायंडा पडतो आहे आणि या गैरवर्तनूकीचा जाब संबधितांना विचारला पाहिजे असे म्हणणे गैर आहे आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे तसेच पुर्व ग्रह दुषित आहे. जायकवाडीच्या दैनंदिन धरणस्थिती अहवालावरून दिवसभरात झालेला सिंचन पाणी वापर शुन्य असल्याचे निदर्शनास येते . त्यामुळे फुगवट्यातून शेतीसाठी पाणी उपसा करणारे एकुण एक कृषी पंप बंद आहेत ,असे समजायचे का ? हा सुद्धा कळीचा आणि दिर्घकाळापासून अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे.

सध्या मान्सुन पॅटर्न आमुलाग्र बदलला आहे. पावसाच्या वितरणात टोकाची विषमता आलेली आहे. गावाच्या एका कोपऱ्यात अतिवृष्टी तर दुसरा कोपरा कोरडा असे सर्रास चित्र दिसून येते. एक दोन वेळा धुंवाधार पाऊस आणि मग दिर्घकालीन खंड असे प्रकार वारंवार घडत आहेत. यावर्षी घाटमाथा वगळता नगर नाशिकच्या उर्वरित पर्जन्यछायेतील भागात हलक्या सरीच्या स्वरुपात पाऊस झाल्याने खरीप पिके त्यातल्या त्यात चांगली आहेत. त्यामुळे त्यांना पाण्याची फारसी गरजही लागली नाही. परंतु अद्यापही पर्जन्यछायेतील या भागात अजुनही जोरदार पाऊस न झाल्याने भुजलपातळी भर पावसाळ्यात खालावत चालली आहे.

ओढे नाले अद्याप वाहते झाले नाहीत. खरेतर जायकवाडीत अद्याप २९ टक्केच पाणीसाठा असल्याचा हा मोठा पुरावा आहे. नगर नाशिक मधील पर्जन्यछायेतील विहीरींनी पावसाळ्यात तळ गाठलेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे उद्भव कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पिकांना नको पण पिण्यासाठी तरी पाणी द्या, ही जनतेतून तीव्रतेने मागणी होत आहे. त्याच मागणीचा विचार करुन जायकवाडीच्या वरील भागातील कालव्यात पाणी सोडलेले आहे. सध्या अपेक्षित असलेल्या सरासरीच्या दीडपट पाऊस नगर जिल्ह्यात झाला हे पर्जन्यमापकावर नोंदले गेलेले चित्र सार्वत्रिक नाही. पर्जन्य मापकांचे तुटपुंजे नेटवर्क पावसाचे खरेखुरे सर्वव्यापी चित्र दाखवण्यास असमर्थ आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापकावर झालेल्या पावसाची नोंदीप्रमाणे हा पाऊस सर्वदुर झालेला नसतो. त्यामुळे त्या नोंदींना या बदलत्या मान्सुन पॅटर्न मध्ये फारशी विश्वासार्हता राहिलेली नाही. ही पर्जन्यमापके म्हणजे असुन अडचण नसुन खोळंबा, अशी झाली आहेत. पर्जन्यमापकाची घनता वाढवली गेली तरच खरेखुरे वस्तुस्थिती दर्शक चित्र समोर येईल.

या पार्श्वभूमिवर सर्वसामावेक आणि सौहार्दाचे धोरण ठेवले जाणे सर्वांच्याच हिताचे आहे. समन्यायीमुळे ज्याच्या त्याच्या हिश्याचे पाणी पंधरा आक्टोबरला मिळणार आहेच. मग त्याआधी हा कालवा, सुटला तो कालवा सुटला यावरुन उगीचच वातावरण दुषित करणे निश्चितपणे स्पृहणीय नाही. खरेतर नगर नाशिक भागातील लाभधारक जायकवाडीतील अल्प साठ्यामुळेच जास्त चिंतीत असतात.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या