Saturday, May 25, 2024
Homeनगर70 हजार जनावरांना देणार ‘लम्पी’ ची लस

70 हजार जनावरांना देणार ‘लम्पी’ ची लस

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यातील गायवर्ग व म्हैसवर्ग अशा सुमारे 70 हजार 241 जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा पशुवैद्यकीय विभागाकडून श्रीरामपूर तालुक्यासाठी 70 हजार 500 लस मात्रा चा पुरवठा उपलब्ध करण्यात आला आहे. महिनाभर चालणार्‍या या मोहिमेतून तालुक्यातील सर्व जनावरांना लम्पी लस देऊन ही मोहिम यशस्वी करण्यासाठी श्रीरामपूर पंचायत समितीच्या पशु वैद्यकीय विभाग व श्रीरामपूर तालुक्यातील 9 पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत ही मोहिम सुरू आहे.

- Advertisement -

मागील वर्षी राज्यासह जिल्ह्यात लम्पी रोगाचे प्रमाण वाढले होते. या रोगामुळे अनेक जनावरे दगावल्याने शेतकर्‍यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे भविष्यात लम्पी रोगाचे प्रमाण वाढू नये म्हणून प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लम्पी लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यादृष्टीने तालुक्यातील गावपातळीवरील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत सर्व जनावरांना लम्पी लस देण्याचे काम सुरु आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील 63 हजार 75 गायवर्ग व 7 हजार 166 म्हैसवर्ग अशा 70 हजार 241 जनावरांना लम्पी लसीकरण करण्यात येणार असून यासाठी 70 हजार 500 लसमात्रा उपलब्ध आहेत. लसीकरणासाठी तालुक्यातील उक्कलगाव, कुरणपूर, निमगाव खैरी, टाकळीभान, मालुंजा, नाऊर, कारेगाव, मातापूर, पढेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुविकास अधिकारी यांच्यासह दवाखान्यांचे सेवादाते, पशुवैद्यकीय पदाविका प्राप्त विद्यार्थी यांच्यामार्फत जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे.

लम्पी रोगाचा प्रसार चावणार्‍या माश्या, डास, गोचिड, चिलटे यांच्यामुळे होतो. त्यामुळे गोठा परिसरात स्वच्छता गरजेची आहे. मागील वर्षी लम्पीमुळे जनावरे दगावल्याने पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा परिणाम दुग्ध व्यवसायावरही झाला होता. त्यामुळे भविष्यात पशुंना अशा प्रकारच्या साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे.

दरम्यान, तालुक्यात काल अखेर 27 हजार 400 जनावरांना लम्पीचे लसीकरण पूर्ण झाले असून उर्वरित राहिलेल्या जनावरांचे लसीकरण जुलै महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत पशुविकास अधिकारी, सेवादाते काम करत आहे.

मागील वर्षी लम्पी रोगामुळे तालुक्यात जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 20 पशुपालकांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत अशी 1 लाख 44 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तर 76 पशुपालकांना शासन स्तरावरील जनावरांच्या वयानुसार 2 ते 30 हजार याप्रमाणे 17 लाख 60 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षातून एकदा असे तीन वर्षापर्यंत नियमित लसीकरण करणे गरजेचे असते. लसीची प्रतिकार क्षमता एक वर्षाची असते. त्यामुळे भविष्यात लम्पी प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालकांनी कोणतेही कारण न देता पशुवैद्यकीय कर्मचार्‍यामार्फत जनावरांना लसीकरण करुन घ्यावे.

डॉ. विजय धिमते, पशुविकास अधिकारी, श्रीरामपूर पंचायत समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या