श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरात काल सायंकाळच्या दरम्यान जनावरांची कातडी घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसीम इब्राहिम सय्यद राहणार जेऊर, अखिल शरीफ कुरेशी राहणार श्रीरामपूर, संतोष धिर्डी राहणार घुमदेव तालुका श्रीरामपूर, सादिक इब्राहिम शेख राहणार श्रीरामपूर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तुषार बाळासाहेब कदम, रा. वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की काल शुक्रवारी मी व माझे दोन मित्र सागर शेटे व राहुल धायगुडे सरस्वती कॉलनी येथे असताना आम्हाला माहिती मिळाली की श्रीरामपूर होऊन जनावरांची कत्तल करून त्यांची कातडे एका 14 टायर ट्रकमधून जात आहे.
तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार आम्ही श्रीरामपूर नेवासा रोडवर गेलो असता सदर ट्रक हा श्रीरामपूर बस स्टॅन्ड समोरून जात होता. तेव्हा ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र तो थांबला नाही तेव्हा पुढे जाऊन उदय पॅलेस येथे सदर ट्रक आम्ही थांबवला तेव्हा ट्रक मधून दुर्गंधवास येत होता. ड्रायव्हरला त्याचे नाव विचारले असता त्याने सादिक इब्राहीम शेख असे सांगितले. तसेच त्याला इतर माहिती विचारला असता त्याने सदर गाडीही अखिल शरीफ पुरेशी व संतोष धिर्डी यांची असून गाडीमध्ये 1050 कातडे असल्याचे सांगत सदर गाडी ही अमरावती येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.
तेव्हा आम्ही सदरचा ट्रक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला आणून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोसई समाधान साळुंखे यांनी कारवाई करत 5 लाख 25 हजार रुपयांची 1050 गोवंशी जातीच्या जनावरांची कातडी तसेच 8 लाख रुपयांचा 14 टायरचा ट्रक असा एकूण 13 लाख 25 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पुढील तपास पोसई समाधान साळुंखे करत आहेत.