मुंबई । Mumbai
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरुन यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलं. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून कुणालाही सोडणार नसल्याचे म्हटले.
आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा पुरावाच समोर आणला आहे. तसेच त्यांनी ट्विट करुन मुंडे आणि कराड यांच्या जमिनीचा सात बारा शेअर केला आहे.
ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन ! हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र , जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले . ३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) , असंही दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अंजली दमानिया यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, संतोष देशमुख हत्या प्रकरणात एव्हाडा कंपनीकडे २ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यासह तीन जणांवर गुन्हे दाखल आहे. खंडणी प्रकरणात अजूनही कराड याला अटक झालेली नाही.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना आरोपींनी गाडीतून नेलं. यानंतर त्यांच्या सहकाऱ्याने पोलीस स्थानकात याबाबत माहिती देऊनही पोलिसांनी पहिले दोन तास कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत केला होता. त्याचबरोबर, हत्या झाल्यानंतरच पोलिसांनी हालचाल केल्याचाही आरोप त्यांनी केला.
या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव सातत्याने समोर येत असून तोच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचाही आरोप होत असून त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात आहे. खुद्द धनंजय मुंडेंनी यासंदर्भातील आरोप फेटाळून लावले आहेत.