मुंबई | Mumbai
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यास कारवाई करू असे जाहीर केले होते. मात्र, दमानियांच्या मते, या प्रकरणातील सूत्रधारच धनंजय मुंडे आहेत. “बालाजी तांदळेला सांगण्यात आले होते की, ९ तारखेपासून तांदळे हा पोलिसांबरोबर फिरत होता. हे प्रकरण शेकायला लागले, तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी या लोकांना अटक करुन तिथल्या तिथे निपटवा. यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह ११ जणांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची उद्रेक पहायला मिळाला. त्यानंतर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरत आहे. त्याच वेळी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या आरोपपत्रावर शंका उपस्थित करताना महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया यांनी म्हटले की, पोलीस खात्याने बालाजी तांदळेला १५ तारखेलाच लिहिलेल पत्र आहे. ९ तारखेपासून बालाजी तांदळे पोलिसांसोबत फिरत होते. लेटर दिले १५ तारखेला. कुठेच पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगत, तू तुझी गाडी घेऊन ये आपण शोध घेऊ. याच्यात धनंजय मुंडे यांचा पोलिसांवर दबाव होता. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला मदत केली. त्यांची कोणाचीही नावे या आरोपपत्रात नाही. कोणाचाही जबाब नाही. राजेश पाटील, महाजन, गीते म्हणून अधिकारी होते, जे खंडणीच्या दिवशी उपस्थित होते, त्यापैकी कोणाचाही जबाब नाही. गीते यानेही टोळीला मदत केली. संतोष देशमुख यांचे अपहरण केले हे माहीत असूनही त्याने आरोपीला मदत केली असल्याचा आरोप दमानिया यांनी केली.
“बालाजी तांदळेने देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी आहे की, पोलिसांनी आरोपी शोधलेले नाहीत. आम्ही गाड्या फिरवून आरोपींचा शोध घेतला, सगळे प्रकरण त्यांच्यावर शेकले जावे. यांच्यापर्यंत येऊ नये. माझी पहिली मागणी ही आहे की सगळ्यांना सहआरोपी करा. आरोपपत्रात अनेक गोष्टी आलेल्या नाहीत” असे अंजली दमानिया म्हणाल्या. “जे पोलीस अधिकारी होते, ज्यांनी प्रचंड मदत केली, त्यांचे कोणाचेही नाव त्यामध्ये नाही. कोणाचेही स्टेटमेंट चार्जशीटमध्ये नाही, २०० लोकांची यादी आहे. संतोष देशमुख यांना उचलून नेलय, तरी सुद्धा मदत केली. हे सगळे सहआरोपी झाले पाहिजेत. माझी मागणी आहे धनंजय मुंडे, सारंग आंधळे, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार, बालाजी तांदळे, डॉ. वायबसे आणि गीते अशा दहा जणांना सहआरोपी करा” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा