बीड । Beed
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी अखेर कैलास फड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास फड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा कार्यकर्ता असून, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो.
मतदानाच्या दिवशी कैलास फड याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या माधव जाधव यांना मारहाण केली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मात्र, त्याच्याविरोधात त्वरित कोणतीही कारवाई झाली नव्हती. अखेर ८२ दिवसांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत मोठी मागणी केली आहे.
“अखेर ८२ दिवसानंतर गुन्हा दाखल! कैलाश फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल, विधान सभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाला हे आता स्पष्ट झाले आहे. इलेक्शन कमिशन कडे असे २० ते २५ तक्रारीचे वीडियो आहेत. त्यातील प्रत्येक वीडियो वर कारवाई करा. परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. किती मतदान झाले ते कळेल एसपी नवनीत कावत यांचे आभार”, अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी शेअर केली आहे.
या प्रकरणाआधीही कैलास फड याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दिवाळीच्या काळात परळीच्या बँक कॉलनीत वाहन पूजा करत असताना एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर परळी शहर पोलिसांनी कैलास फड याला अटक केली होती. या प्रकरणी पोलीस अंमलदार विष्णू फड यांनी तक्रार दाखल केली होती.
बीड जिल्ह्यामध्ये परवानाधारक शस्त्र परवान्यांपैकी आतापर्यंत ३१० जणांचे शस्त्र परवाने हे रद्द करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये एकूण १२८१ इतके शस्त्र प्रमाणे आहेत मात्र ज्या व्यक्ती वरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत त्या व्यक्तीकडील पिस्तूल परवाना रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता आणि त्याची कारवाई मागच्या एक महिन्यापासून सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण परवानाधारक पिस्तूल चा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या २५ % परवाने हे रद्द झाले आहेत.