मुंबई | Mumbai
बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या शिरूरमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भाजप पदाधिकारी असलेला सतीश भोसले (Satish Bhosale) हा त्याच्या काही साथीरांसह एकाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आहे. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भोसलेचा एक दुसरा व्हिडीओ अंजली दमानिया यांनी शेअर केला असून यात तो पैशाचे बंडलं कारमध्ये उधळतांना दिसत आहे.
अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले की,”हाच तो सतीश भोसले? कोण आहे हा? कुठून आले एवढे पैसे? अटक करा या माणसाला, अशी मागणी त्यांनी केली आहे. या व्हिडीओमध्ये (Video) सतीश भोसले (Satish Bhosal) हा नोटांचे बंडलं दाखवत आहे. काही वेळानंतर नोटांचे बंडलं हे कारच्या डॅशबोर्डवर फेकत आहे. यात ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांच्या बंडलांचा समावेश”, असल्याचे दिसत आहे.
दमानिया पुढे म्हणाल्या की,”सतीश भोसलेच्या प्रत्येक व्हिडीओत आणि फोटोमध्ये त्यांच्या हातात सोनं आहे. गळ्यात सोनं आहे. मी बाई असून माझ्या हातात सुद्धा सोन्याच्या बांगड्या नाहीत. याच्याकडे येवढं सोनं कुठून आलं? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच फडणवीस यांना असा महाराष्ट्र नको असेल तर त्यांनी अधिवेशनात यावर बोललं पाहिजे. नाही तर मी अधिवेशनाबाहेर आंदोलन करणार आहे. आजच्या दिवस मी वाट बघेल, नाही तर उद्या सकाळपासून मी ठिय्या देणार आहे. मी हे सर्व फोटो (Photo) घेऊन बसणार असून अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे”, असे त्यांनी म्हटले.
व्हिडीओ समोर आल्यानंतर सुरेश धस काय म्हणाले?
सतीश भोसलेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, “हो, सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. त्याचा मारहाणीचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ मी बघितला आहे. त्यानंतर मी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना फोन केला आणि त्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे? त्यानंतर मला माहिती मिळाली की ही एका साखर कारखान्याच्या परिसरात घडलेली घटना आहे. ऊसतोड मजुराच्या घरातील महिला अथवा मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर ती घटना घडली होती. ती दीड वर्षांपूर्वीची घटना आहे. मात्र या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यानंतर मी पोलिसांना (Police) स्पष्ट सांगितलं की, मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती तक्रार घ्या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे त्यांनी म्हटले आहे.