सुपा | वार्ताहार | Supa
दिल्लीत येऊन आप(APP) पक्षाविरूद्ध लोकपाल चळवळीसारखे आंदोलन करून आवाज उठविला पाहिजे आणि आम्हाला सहकार्य करावे असे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता(delhi bjp president adesh gupta) यांनी २४ ऑगस्टला जेष्ठ समाज सेवक आण्णा हजारे यांना पत्र लिहिले होते. त्याला उत्तर देताना आण्णा हजारे म्हणाले की,
प्रेसला लिहिलेले तुमचे पत्र वाचून मला वाईट वाटले. तुमची भारतीय जनता पार्टी(bjp) मागील सहा वर्षाहून अधिक काळ देशात सत्तेत आहे. युवा शक्ती ही राष्ट्रीय शक्ती आहे. तुमच्या पार्टीमध्ये तरुणांची संख्या मोठी असून जगातील सर्वाधिक पार्टी सदस्य असल्याचा दावा करणारे नेते, मंदिरात १० बाय १२ फूट खोलीत राहणाऱ्या ८३ वर्षीय अण्णा हजारे यांच्यासारखे, ज्यांच्याकडे पैसा नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही अशा माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहे, यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते.
आज केंद्रात आपल्या पार्टीचे सरकार आहे. दिल्ली सरकारचे(delhi goverment) अनेक विषयही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. सीबीआय, आर्थिक अपराध, व्हिजनस, दिल्ली सरकारचे पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पंतप्रधान नेहमीच असा दावा करतात की केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत. जर अशीच परिस्थिती असेल आणि जर दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? की भ्रष्टाचार निर्मूलनाचे केंद्र सरकारचे सर्व दावे निरर्थक आहेत?
वयाच्या ८३ व्या वर्षी मी समाज, राज्य आणि देशाच्या हितासाठी २२ वर्षांपासून अहिंसेच्या मार्गाने आंदोलने केले आहेत. २० वेळा उपोषण केले आहे. आजपर्यंतच्या आंदोलनामुळे सहा मंत्र्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले. सत्तेवरून पायउतार झालेल्या मंत्र्यांमध्ये विविध पक्षाचे मंत्री आहेत. मी कोणताही पक्ष किंवा पार्टी पाहून आंदोलने केलेली नाहीत. मला कोणत्याही पक्ष आणि पार्टीचे घेणेदेणे नाही. फक्त गाव, समाज आणि देशाच्या भल्यासाठीच मी आंदोलन करीत आलेलो आहे.
सत्तेत असलेल्या ज्या पार्टीच्या विरोधात माझे आंदोलन झाले त्या पार्टीने नेहमी माझे नाव दुसऱ्या पक्ष-पार्टी बरोबर जोडले आहे. रेडीमेड कपड्यांचे दुकान असते. त्या दुकानातील कपडे कुणाच्या शरीराचे माप घेऊन शिवलेले नसतात. परंतु ते रेडीमेड कपडे कुणाच्या ना कुणाच्या शरीराला फिट येतात. ज्यांच्या शरीराला ते रेडीमेड कपडे फिट येतात त्यांना वाटते हे आमच्यासाठीच शिवलेले आहेत. आज अनेक पक्ष-पार्ट्यांचे असेच झालेले आहे. आमच्या आंदोलनामुळे ज्या पक्ष-पार्टीचे नुकसान झाले आहे तो पक्ष-पार्टी मी दुसऱ्या पक्ष-पार्टीचा हस्तक आहे अशी अफवा व गैरसमज समाजामध्ये पसरवित असतो. आजपर्यंत अनेक वेळाला माझी नींदा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु अण्णा हजारे ला काही फरक पडत नाही. मी आजही तोच अण्णा हजारे आहे.
वाढत्या भ्रष्टाचारामुळे २०११ चे दिल्ली आंदोलन झाले. लोकांना आपले जीवन जगणे कठीण झाले होते. भ्रष्टाचारामुळे जनता अस्वस्थ झाली होती. अशा परिस्थितीत अण्णा हजारे यांच्यासारखा व्यक्ती आपल्यासाठी आंदोलन करत आहेत असा विचार करून दिल्ली आणि देशातील लोक रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर २०१४ मध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवून तुमचे सरकार सत्तेत आले. परंतु जनतेच्या समस्या काही कमी झाल्या नाहीत. एका पक्ष-पार्टीला नेहमी दुसऱ्या पक्ष-पार्टीचा दोष दिसतो. कधीकधी एखाद्या पक्ष-पार्टीने स्वत: आत्मपरिक्षण करून स्वतःच्या दोषांविरूद्ध बोलले पाहिजे.
सद्य परिस्थितीत मला वाटत नाही की देशातील कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देण्यास सक्षम आहे. आज अनेक पक्ष-पार्टी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात गुंतलेले आहेत. कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, लोकांना दिलासा मिळणार नाही. म्हणून मी दिल्लीत येऊन काही फरक पडणार नाही. अशी माझी धारणा आहे. देशात बदल फक्त पक्ष बदलून नव्हे तर व्यवस्था बदलून होईल. सिर्फ हंगामा खडा हो यह हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है यही की सुरत बदलनी चाहीए।” असे अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात सांगितले आहे.
भाजपा केंद्रात सत्तेत आहे शिवाय जगातील सर्वात मोठा पक्ष आसल्याचा दावा करणाऱ्या पक्षाला माझ्या मदतीची गरज का भासली ते माझ्याकडून आंदोलनाची अपेक्षा का ठेवतात
आण्णासाहेब हजारे, जेष्ठ समाज सेवक, राळेगण सिद्धी