Monday, July 22, 2024
Homeजळगावजळगाव जिल्हा परिषद प्रशासकांची वर्षपूर्ती!

जळगाव जिल्हा परिषद प्रशासकांची वर्षपूर्ती!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्हा परिषदेतील (Jalgaon Zilla Parishad) राजकीय पदाधिकार्‍यांसह सदस्यांचा कार्यकाळ दि.20 मार्च 2022 रोजी संपुष्टात आल्यानंतर प्रशासक (administrators) म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.पंकज आशिया हे विराजमान झालेले आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्हा परिषदेची सूत्रे जि.प.सीईओंकडे असून राजकीय पदाधिकार्‍यांना विना जिल्हा परिषदेचा कारभार सुरु आहे.आज दि.20 मार्च 2023 रोजी जि.प.प्रशासक म्हणून डॉ.पंकज आशिया यांना वर्षपूर्ती (Anniversary) होत आहे. त्यांनी वर्षभरात छत्रपती शाहू महाराज जि.प.सभागृह, कुपोषण, बाला प्रकल्प यासह विविध विकास कामांना दिलेली गती ही लक्ष्यवेधी ठरली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना प्रल्हाद पाटील आणि उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 20 मार्च 2022 मध्ये पूर्ण होऊन राजकीय सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर प्रशासकपदाची धुरा जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्याकडे आली. दोन ते तीन महिन्यांनी ओबीसी आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर निवडणुका होतील, अशी आशा पदाधिकार्‍यांना होती.

मात्र, ओबीसी आरक्षणाचा तिढाही सुटलेला नसल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर जून महिन्यात शिंदे गट आणि भाजपा असे समीकरण जुळवून राजकीय सत्ता परिवर्तन झाले. भाजप- शिंदे गटाचे सरकार स्थिर झाल्यानंतर तीन महिन्यात निवडणुका होतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात होता. मात्र, भाजप-शिंदे गटाच्या सरकारला धिरे-धिरे नऊ महिने पूर्ण होऊनही जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट होत नाही. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणखीनच लांबणीवर पडत-पडत जिल्हा परिषदेच्या प्रशासक पदाला वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. गेल्या 21 मार्च 2022 ते 20 मार्च 2023 पर्यंत अर्थात वर्षभर जिल्हा परिषदेच्या कारभाराची सर्व सूत्रे जि.प.सीईओ र्डा.पंकज आशिया यांनी चांगल्या प्रकारे हाताळीत जिल्हा परिषदेच्या इतिहासात काही महत्पूर्ण निर्णय घेऊन यंदा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्पात देखील 12 कोटींनी वाढ झाली आहे.

प्रशासक डॉ.पंकज आशिया यांनी सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज जि.प.सभागृह दुरुस्तीसाठी 9 कोटींची तरतूद केली. स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांसाठी 25 लाखांची तरतूद केली.तसेच सिंचन योजना, जिल्ह्यातील कुपोषण, बाला प्रकल्प, अनुकंपा भरती, ग्रामीण घरकुल यासह विविध कामांना गती देवून घरकुल योजनेत नाशिक विभागातून प्रथम पुरस्कार देखील सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी पटकाविला. दरम्यान, जिल्हा परिषदेवर एक वर्षापासून प्रशासकराज सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या केव्हा निवडणुका लागतील, याविषयी आजी-माजी सदस्यांना उत्सुकता लागून आहे. तसेच नवीन इच्छुकांनी देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कंबर कसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या