Saturday, April 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजराज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा - नाना पटोले यांची मागणी

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा – नाना पटोले यांची मागणी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते आणि कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत. कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे तेलंगणाप्रमाणे महायुती सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केली. महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देईल, असेही त्यांनी जाहीर केले.

राज्यात यावर्षी काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे, तर काही भागात अजून पावसाची प्रतिक्षा आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. बोगस खते बि-बियाणांचा सुळसुळाट आहे. पण सरकार फक्त कारवाई करण्याच्या पोकळ घोषणा करते. पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्याला मिळत नाही. परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील ६ महिन्यात राज्यात १ हजार ७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्यातील शेतकऱ्याची आताची परिस्थिती अत्यंत बिकट असून कर्जमाफी करण्याची गरज आहे, असे पटोले म्हणाले.

मोठ्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज भाजप सरकारने माफ केले. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे नाहीत. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडे कर्जमाफीच्या संदर्भात मागणी केली होती. महायुती सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती. पण केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांची घोर निराशा केली, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...