मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्यातील तरुणांना सरकारी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ हा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. फडणवीस यांनी शनिवारी ‘एक्स’ या समाज माध्यमातून या कार्यक्रमाची घोषणा केली.
या उपक्रमांतर्गत राज्यातील ६० तरुणांची निवड करण्यात येणार असून, त्यांना एक वर्षासाठी जिल्हाधिकारी वा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधीन महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. तरुणांना प्रशासनासोबत थेट काम करण्याचा अनुभव मिळावा. त्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या कक्षा विस्ताराव्यात. तसेच त्यांच्या कल्पकतेचा, ताज्या दृष्टिकोनाचा आणि तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग प्रशासनाला व्हावा, यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयामार्फत होणार आहे.
फेलोशिपचा कालावधी १२ महिने असून आणि वयोमर्यादा २१ ते २६ वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून लवकरच सुरू होईल. अर्ज शुल्क ५०० रुपये असेल. पात्रता म्हणून कोणत्याही शाखेतील किमान ६० टक्के गुणांसह पदवी, एक वर्षाचा अनुभव, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संगणक हाताळणीचे कौशल्य आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन चाचणी, निबंध लेखन आणि मुलाखत हे तीन टप्पे असतील. फेलोंना एकूण ६१ हजार ५०० रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.