Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedवार्षिक भविष्य २०२४ - कन्या : वर्षाचा पूर्वार्ध - आरोग्य, चिंता, उत्तरार्ध-भाग्यकारक

वार्षिक भविष्य २०२४ – कन्या : वर्षाचा पूर्वार्ध – आरोग्य, चिंता, उत्तरार्ध-भाग्यकारक

पुरुष – समस्त कन्या राशि पुरुषांना नवीन वर्ष आपणास मिश्रित स्वरुपाचे जाणार आहे. वर्षाचे प्रथम सहा महिन्यात आपणास ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. अधिकांशरित्या याकाळात आरोग्याच्या समस्या अधिकच राहणार आहेत. जुनाट विकार पुन:श्च डोके वर काढतील. ज्या कारणासाठी ऑपरेशन टाळली गेली होती ती करावी लागतील. शत्रू डोके वर काढतील. कोर्ट कचेरी तसेच कायद्याच्या प्रश्नात चिंता निर्माण होतील. वर्षकाळात मोठ्या वस्तुंची खरेदी कराल. वास्तु खरेदी, वास्तु बांधकामदेखील होणार आहे. हा काळ सर्वचदृष्ट्या भरभराटीचा असणार आहे.

महिला – महिलांनी प्रथम सहामाहीत विचार करुनच वागावे. घरात वाद होणार नाही याकडे लक्ष द्यावे. नवीन दाम्पत्यानी थोडे-फार वाद झाल्यास त्याचे विचार करीत बसू नये. अन्यथा प्रकरणे कोर्टात जाण्याची शक्यता आहे. विवाह इच्छुक तरुणींनी अरेंज मॅरेज, आई-वडिलांचे पसंतीने विवाह करावयाचे ठरविल्यास त्यांना अतीउत्तम असे स्थळ लाभणार आहे. प्रेमविवाह करु इच्छिणार्‍या तरुणींनी विवाह करण्यापूर्वी खूपच विचार करावा नंतर मात्र विवाह झाल्यावर नित्यवार आपणास विचार करावा लागणार आहे. तरुणींना उत्तम नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत.

- Advertisement -

नोकरवर्ग – कन्या राशिगत नोकरवर्गाने आहे त्याचजागी नोकरीवर कार्य करावे. दुसरीकडे नोकरीवर जाण्याचा विचार सोडून द्यावा. प्रथम सहा महिन्यात नोकरवर्गाने आपले सर्व कार्य वेळेच्यावेळी करावीत व कारण नसतांना सुटीवर जावू नये. वरिष्ठ अधिकारी वर्गाशी वाद न करता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कार्य करावे. वर्षाचे उत्तरार्धात आपली बढती होईल व आपले पगारात वाढदेखील होईल. कंपनीत नोकरी असेल तर परदेशगमनाच्या संधी पण प्राप्त होणार आहेत. आपल्या कलागुणांना पण वाव मिळणार आहे. या वर्षात दुखापतीचे योग आहेत, सावधपूर्वक रहावे.

व्यवसाय – तेलबियाचे व्यापारी, ऑईल मिल, पेट्रोल-डिझेल पंपधारक, कोळश्याचे व्यापारी, लोखंडाचे व्यापारी, लोखंडी वस्तु कामकाज कर्मचारी, वाहन उद्योग, वाहन सर्व्हिसिंग, ऑटोपार्ट व्यावसायीक, चपला, जोडे, चामड्याचे व्यापारी, संशोधक, वकिल मंडळी, कोर्टकचेरी कर्मचारी, ज्योतिषीवर्ग, सर्जन, कुंभार या सर्वांना हे नवीन वर्ष प्रगतीचे असणार आहे. लाभाचे असणार आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात आपणाजवळ व्यवसायासाठी जागा नसेल तर व्यवसायी जागा खरेदीचे योग आहेत. व्यवसायासाठी वाहन खरेदीचे योग पण आहेत. सर्व कामकाज कायद्याला धरुन करावे.

विद्यार्थीवर्ग – ज्या विद्यार्थीवर्गाची राशी कन्या आहे त्यांना या वर्षातील सहा महिने त्रासदायकच राहणार आहे. काही चुकीच्या मित्रांचा संबंध येणार आहे. याबाबत आपणास खूपच सावध रहावे लागणार आहे. मानसिक चिंता, व्यथा वाढविणारा हा महिना असणार आहे. दुसरे विद्यार्थी उचापती करतील आणि त्यासंबंधी तुमचे नाव येईल अशा घटनांपासून आपण दूर रहावे. या वर्षाच्या उत्तरार्धातील सर्व हवामान आपल्या बाजुचे असणार आहे. या काळातील सर्व परिक्षा यात यश संपादन करण्याची शक्यता आहे. शालेय कार्यातील अडथळे दूर होतील.

राजकारणी – ज्या राजकारणी नेत्यांनी पक्ष बदल केलेला आहे. त्यांना या वर्षातील सहा महिने वार्‍यावर असल्यासारखे असणार आहे. नवीन हायकमांड आपणाकडून त्यांना हवे तसे काम करुन हाती गाजर ठेवण्याची शक्यता आहे. आपलेच स्वतःच्या घरातून आपणास विरोध केला जाणार आहे. मानसिक टेंशन देणारा हा काळ या वर्षाचे सात महिन्यानंतर राहणार नाही. राजकीय हायकमांड आपणास थोडा फार दिलासा देण्याची शक्यता आहे. आपल्या कुंपणाच्या उड्या या काळात थोड्या फार फरकाने यशस्वी होण्याची शक्यता आहे.

आरोग्य – या नवीन वर्षाची सुरुवातच आपणासाठी शारीरिक अस्वस्थता घेवून येणारी आहे. पथ्यपाणी पाळण्याची बंधने आपणास पाळावी लागणार आहे. खास करुन घरातील वृद्ध मंडळींच्याच आजारपणाचा काळ अधिक असेल. त्यात त्यांना दुखापतीचे योग प्रबळ आहेत. आपल्या दुखापतीकडे मुले कितपत लक्ष देतील हा एक प्रश्न उभा राहणार आहे. ऑपरेशनचे योग प्रबळ आहेत. या वर्षाचा उर्त्तरार्धी आपणास आरोग्याच्याबाबतीत दिलासा देणारा ठरणार आहे. ज्यांची ऑपरेशन झालेली आहेत त्यांच्या आरोग्यात निश्चितपणे सुधारणा होईल.

नातीगोती – वर्षाच्या प्रारंभी कन्या राशी व्यक्तींना नातेसंबधाबाबत खूपच सावधानपूर्वक वागावे लागणार आहे. क्षुल्लक कारणावरुन वाद घडण्याची शक्यता आहे. यातून विवाह अथवा इतर मंगलकार्य ठरविले गेले असल्यास ते मोडले जाण्याची शक्यता आहे. यासाठी आपण आपले मुख्य कार्याकडे लक्ष देवूनच वागावे. आपल्याबाबत विनाकारण कोणाचे गैरसमज होणार नाहीत याची खास करुन काळजी घ्यावी. हे आपल्याच लाभाचे आहे. या नववर्षातील ही पूर्वार्ध परिस्थिती या वर्षाच्या उत्तरार्ध काळात बदलणार आहे. यामुळे या काळात आपणास नवीन नातेवाईक मंडळी लाभणार आहे. नातेवाईक मंडळीची वर्दळ राहील.

आर्थिक – समस्त कन्या राशिच्या व्यक्ती आपण कसलेही कार्य करीत असले तरी आपण या वर्षात स्वतःचे हातानेच व्यवहार करावे. कोणावर विसंबून राहू नये. याशिवाय घराला कुलूप लावून बाहेर किंवा बाहेरगावी जावू नये. खरेदी-विक्रीत लाभ मिळतील. उत्तरार्ध वर्षात आर्थिक प्रगतीचे योग भरपूर आहेत. या काळात सोने-चांदीचे दागिने खरेदी कराल. भूमी, शेती खरेदीचे योग पण प्रबळ आहेत. काहीबाबतीत आपण लोभाला बळी पडू नये. यात फसवणुकीची शक्यता आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद कसे मिळतील? त्यादृष्टीने आपण वागण्याची पद्धत ठेवावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या