नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधातील प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, आधीच लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अटकेत असलेल्या खरातविरुद्ध आणखी एक नवीन गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना ‘पूजा विधी’च्या नावाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, ही बाब उघड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, महिलेसोबत आलेल्या तिच्या पतीला बाहेर थांबवून आतमध्ये ‘विधी’च्या नावाखाली हा प्रकार घडवण्यात आला. तपासात खरातने लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी नकली साप आणि वाघाचे कातडे वापरून अघोरी प्रकार केल्याचाही आरोप समोर आला आहे.
या प्रकरणात लैंगिक अत्याचारासह महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नव्या गुन्ह्यामुळे विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीला वेग आला असून, आणखी पीडित पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुन्हे शाखेकडून खरातची कसून चौकशी सुरू असून, रविवारी त्याला अज्ञातस्थळी हलवण्यात आले. SIT प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते स्वतः तपासावर लक्ष ठेवून आहेत.
याशिवाय, खरातच्या ‘ईशान्येश्वर’ मंदिरातील पुजारी आणि काही कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. या तपासातून मंदिर आणि संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींचा मोठा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




