Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधआणखी एक स्मरण ; पंकजाताई पुन्हा बोलल्या

आणखी एक स्मरण ; पंकजाताई पुन्हा बोलल्या

ल.त्र्यं.जोशी

भारतीय जनता पक्षाच्या एक राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशाच्या पक्ष प्रभारी पंकजा मुंडे या त्या पक्षातील, त्या पातळीवरील कदाचित एकमेव नेत्या असतील की, त्यांच्याकडे पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल कमीत-कमी बोलत असतील व व्यक्तीगत समस्यांबद्दल, ज्या केवळ वरिष्ठ नेत्यांकडेच बोलायच्या असतात, त्याबद्दल सातत्याने बोलत असतील.

- Advertisement -

वास्तविक त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशाच्या प्रभारी आहेत पण त्या प्रदेशातील घडामोडींबद्दल वा राष्ट्रीय मुद्यांबद्दल फारशा काय, मुळीच बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्याचा प्रामुख्याने एकच विषय असतो व तो म्हणजे पक्षात त्यांच्यावर, त्यांच्या खासदार बहिणीवर होणारा कथित अन्याय. वेळोवेळी होणारी वक्तव्ये आणि त्यांची होणारी कथित घुसमट. एवढ्या मोठ्या संघटनेत त्यांच्यासारखी कथित अवस्था असलेले अनेक कार्यकर्ते असूच शकतात.पण असे दिसते की, ते आपल्या समस्या योग्य त्या पातळीवर मांडून सोडवून घेत असतील किंवा राजीनामा देऊन मोकळेही होत असतील. लोकशाही असलेल्या कोणत्याही पक्षात असेच चालते. पण पंकजांना तो मार्ग पसंत नाही असे दिसते. त्यामुळे त्या महाराष्ट्रात येत असाव्यात, भगवान गडावर किंवा गोपिनाथ गडावर जाऊन मन मोकळे करीत असाव्यात. तेवढ्यावरच विषय थांबला असता तर ते समजून घेताही आले असते. पण त्या त्यापुढे जाऊन पक्षाच्या राष्ट्रीय सचिवाला न शोभणारी वादग्रस्त वक्तव्ये करतात. कदाचित इतर पक्षांमध्ये असला प्रकार पचलाही नसता पण भाजपानेतृत्व जरा अधिक सोशिक दिसते. त्यमुळे ते पंकजांचे वाटणे खपवून घेते किंवा गोपिनाथ मुंडे यांच्या पुण्याईचा विचार करते.

आता त्यांनी एक नवाच पवित्रा घेतला आहे, जो कोणत्याही राजकीय पक्षात कधीच नसतो. तो म्हणजे रजेवर जाण्याचा. राजकीय नेते मधूनमधून विश्रांती घेत नाहीतच असे नाही. पण त्याना जाहीर करुन रजेवर जाण्याची, तसे घोषित करण्याची गरज नसते. कारण कोणताही नेता पक्षाचा पगारी नोकर नसतो. पण आता त्यांनी ‘आपण दोन महिने रजेवर जात असल्याचे’ जाहीर केले व तेही आपल्या मनातील कथित अन्यायाची मळमळ ओकून. हा प्रकार भाजपासारख्या अनुशासनाला प्राधान्य देणार्‍या पक्षात कसा काय चालू शकतो, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

पंकजांच्या संदर्भात नेहमीच असा वाद निर्माण होतो. एवढा की, त्यासाठीच त्यांचा अट्टहास असतो की, काय अशी शंका यावी. खरे तर त्यांना आपल्या व्यथा मांडण्यासाठी पक्षात पुरेशी व्यासपीठे उपलब्ध आहेत पण तरीही त्या बोलतात व वादात अडकतात. आताही त्यानी विधान परिषद उमेदवारीबद्दल पक्षनेतृत्वावर नथीतून तीर सोडलेच. त्यांच्या या सवयीबाबतच मी यापूर्वी फेसबूकवर लिहिले होते. त्यावेळी त्यांच्या खासदारभगिनी प्रीतमताई यांना न मिळालेल्या मंत्रिपदाची पार्श्वभूमी होती तर आता त्यांचा स्वतःचा संदर्भ आहे. मळमळ मात्र तशीच. त्यातील खालील अंश आजही संदर्भहीन झालेले नाहीत. त्या लेखात मी असे नमूद केले होते की, ‘भारतीय जनता पार्टीच्या एक राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीच्या एक सदस्य पंकजा पालवे-मुंडे यांच्या मंगळवारच्या भाषणाचा एकंदर बाज पाहिला तर बहिणीला मंत्रिपद न मिळणे, हे त्यांनी मनोमन स्वीकारलेले दिसत नाही. त्यांच्या भाषणात त्वेष नक्कीच होता पण तो सात्विक संताप होता की, वैफल्य होते, हे कळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत व मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत. खरे तर दिल्ली येथे पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यानी बोलाविलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीसाठी राजधानीत गेल्या होत्या. त्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रदीर्घ बैठकीत सहभागी झाल्या होत्या. या बैठकींहून परतल्यानंतर आपण नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी काय करणार आहोत हे सांगणे अपेक्षित होते. पण त्याबद्दल एक अवाक्षरही न काढता त्यांनी केवळ आपली बहिण डॉ.प्रीतम मुंडे याना मंत्रिपद न मिळाल्याची खंतच अधिक व्यक्त केली. मी ऐकलेल्या त्यांच्या भाषणात भाजपा हा शब्द एक-दोनदाच ऐकला. बाकी पूर्ण भाषण मी, माझा, मला या शब्दांनीच भरलेले होते. पक्षाची शिस्त आपण पाळली पाहिजे, पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, या अपेक्षित आवाहनाचा तर जणू त्यांना विसरच पडला होता. प्रत्येक वाक्यात मुंडेसाहेब आणि समाज या उल्लेखांची मात्र रेलचेल होती. भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांच्या प्रथम नड्डा यानी घेतलेल्या व नंतर मोदीजींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीतून त्या आल्या असे एकदाही जाणवले नाही.

वास्तविक पंकजा मुंडे या राजकारणात नवीन नाहीत. पंतप्रधान वा मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची रचना वा पुनर्रचना कशी करतात याची त्यांना चांगली माहिती आहे. अशा काळात माध्यमांमधून कशा बातम्या येतात व त्या शंभर टक्के खर्‍या नसतात. त्यात अंदाजबाजीही असते, हेही त्याना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवायचा हे त्यांना कळायलाच हवे, असे असताना केवळ अंदाजावर विश्वास ठेवून आपल्या बहिणीला डावलले गेल्याचा आरोप करणे व त्यासाठी आपल्या कथित विरोधकांना कौरव-पांडवांच्या भाषेत जबाबदार धरणे किती बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, हे अन्य कुणाला नसेल पण पंकजाताईंना नक्कीच ठाऊक आहे. तरीही त्या जेव्हा संताप व्यक्त करतात तेव्हा तो सात्विक राहत नाही. उलट वैफल्य प्रकट करणारा ठरतो. याचा एक अर्थ असाही निघू शकतो की, ‘पक्षात आपल्याला भवितव्य नाही, असा संकेत त्यांना मिळाला असावा. त्यामुळे त्या वैफल्यग्रस्त झाल्या असाव्यात’. आजही ते प्रतिपादन जसेच्या तसे लागू पडते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या