नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक ग्रामीण पोलीसांकडून आता अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. काल (दि.6) पासून त्याची सुरुवात करण्यात आली असून मोहीम 31 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे.
मागील काही महिन्यांपासून नाशिक ग्रामीण पोलिसांचे अवैध व्यवसायांविरुद्ध अभियान सुरू आहे. यामध्ये अवैध दारू उत्पादन रोखण्यासाठी ग्रामीण पोलीसांनी मासरेडचे आयोजन केले होते. या कारवाई दरम्यान दारू उत्पादनांचे ठिकाणी धाडी टाकून तयार मालासह गावठी मद्य निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणार्या गुळ, नवसागर अशा साधने जप्त करण्यात आली होती. 1 जानेवारी 2023 पासून आता पर्यंत नाशिक ग्रामीण पोलीसांनी दारूबंदी कायद्याखाली एकूण 2 हजार 848 गुन्हे दाखल करुन तब्बल 4,06,10,612 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्री यांच्याविरुद्ध सातत्याने कारवाई केल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून नाशिक ग्रामीण पोलीसांनी गुटखा विरोधी अभियान राबविले होते. या अभियान दरम्यान पोलीसांनी गुटख्याची निर्मिती, वाहतूक व विक्री करणार्या 178 जणांंविरुद्ध 169 गुन्हे दाखल करून तब्बल 2 कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
तर कालपासून नाशिक ग्रामीण पोलीसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेतले आहे. या मोहीमेत जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे रॅकेट शोधून त्यांची पाळेमुळे उध्वस्त करण्यात येणार आहे. तर यापूर्वी हाती घेतलेले अवैध व्यवसाय निर्मूलनाचे काम देखील सातत्याने सुरूच राहणार आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नागरिकांनी आपल्याकडील उपयुक्त माहिती अवैध व्यवसाय विरोधी हेल्पलाईन क्रमांक 6262 (25) 6363 यावर व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून द्यावी, माहिती देणार्याचे नाव देखील विचारण्यात येणार नाही. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे निर्मूलन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांना सहकार्य करावे.
– शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक, नाशिक