चांदोरी| वार्ताहर
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर व मेथीच्या जुडी एक रुपयाला पुकारल्याने शेतकर्याने तीन हजार जोड्या निफाड तालुयातील चांदोरी परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून देत संताप व्यक्त केला.
तळेगाव रोही येथील शेतकरी कैलास नामदेव जिरे यांनी (दि.१७) रोजी नाशिक बाजार समितीत तब्बल तीन हजार जुडी कोथिंबीर व दोन हजार जुडी मेथी विक्रीला नेली होती. बाजार समितीत लिलावात भाजीला अवघा एक रुपया प्रतिजुडीप्रमाणे भाव पुकारण्यात आला. त्यामुळे संबंधित शेतकर्याने व्यापारी व नंतर ग्राहकांना मोफत देण्यापेक्षा रस्त्याने जाणारे येणारे मुकी जनावरे खातील, या हेतूने नाशिक-संभाजीनगर मार्गावर चांदोरी परिसरात जागोजागी भाजी फेकून देत सरकारचा निषेध केला.
यावर्षी मे महिन्यापासून पावसाची संततधार सुरू असल्याने कोणतेच पीक घेता येत नाही. जी पिके घेतली ती पावसामुळे सडून गेली आहे. सध्या बाजारात भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर कडाडलेले असले तरी त्याचा फायदा प्रत्यक्ष शेतकर्यांना होताना दिसत नाही. बाजार समितीत शेतकर्यांच्या पालेभाज्यांना अत्यल्प दर मिळत असून, हाच खरेदी केलेला भाजीपाला व्यापारी छोट्या व्यवसायिकांना जादा दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या उत्पादीत मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
रक्ताचे पाणी होते; कष्टाचे दाम मिळत नाही
आम्ही जीवाचे रान करून भाजी पिकवितो, पण मार्केटमध्ये भाव मिळत नाही. इतया कमी दराने विकायचे तर काहीही हातात राहत नाही. आज आम्हाला वाहन भाडे देखील खिशातून भरावे लागत आहे. त्यामुळे आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. मार्केट कमिटीने तसेच सरकारने या गंभीर बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कैलास जिरे, शेतकरी, तळेगाव रोही




