Friday, June 21, 2024
Homeनगर...तर शिवाजी कर्डिले यांनी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा

…तर शिवाजी कर्डिले यांनी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

मागील आठवड्यात जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या परदेश अभ्यास दौरा, नवीन चार चाकी वाहनांवरील उधळपट्टी यावर बोट ठेवणार्‍या निलंबीत कर्मचारी आप्पासाहेब गोपाळघरे यांनी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना आव्हान दिले आहे. मी जिल्हा बँकेत फ्रॉड, गैरव्यवहार केल्याचे अध्यक्ष कर्डिले यांनी सिध्द करावे, ते कर्डिले यांना सिध्द न करता आल्यास त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समाज सेवेतून कायम स्वरुपी मुक्त व्हावे, अशी मागणी गोपाळघरे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिध्द दिलेल्या पत्रकात गोपाळघरे यांनी म्हटले, बँक संचालक मंडळाचा परदेश दौरा, नवीन गाड्या खरेदी, तसेच माध्यमिक शिक्षकांचा अपघात विमा पॉलिसी याबाबत मी सर्वसाधारण सभेत सूचना मांडली होती. माझ्या मनोगतानंतर त्यावर सर्वसाधारण सभेत खुलासा करताना अध्यक्ष कर्डिले यांनी मी बँकेत फ्रॉड केल्यामुळे मला बँकेतून कामावरून निलंबित करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच निलंबित केले म्हणजे कामावरून कायम स्वरूपी बडतर्फ करणे नसून अध्यक्ष कर्डिले यांनी बँकेच्या प्रशासनाकडून माझ्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती घ्यावी.

त्यांनी सर्वसाधारण सभेत केवळ वेळ मारून नेण्यासाठी मी फ्रॉड केल्याचा आरोप केला असून तो आधी सिध्द करून दाखवावा.तसेच हा आरोप सिध्द न झाल्यास कर्डिले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत समाज सेवेतून कायमस्वरुपी मुक्त व्हावे. माझ्या बद्दल कोणत्याही स्वरुपाचा खोटा अफवात्मक अफरातफरीचा आरोप करणे चुकीचे असल्याचे गोपाळघरे यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रकात सविस्तरपणे खुलासा केलेला आहे.

कर्डिले यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा

जिल्हा बँकेचे निलंबीत कर्मचारी गोपाळघरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात त्यांच्या विरोधात 100 कोटींच्या मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे. मी बँकेत सेवेत असताना माझ्या विरोधात चार आरोप करण्यात आलेले आहेत. त्यात कोणत्याही अफरातफरीचा समावेश नाही. माझ्यावर केवळ राजकीय स्वार्थातून आरोप करण्यात आले असून यामुळे समाज, नातेवाईक आणि मित्र परिवारात बदनामी झालेली असून यामुळे माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत आहे. यामुळे माझ्या तक्रारीवरून कर्डिले यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गोपाळघरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या