Friday, September 20, 2024
Homeनगरकर्ज घेता का कर्ज! जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून आवाहन

कर्ज घेता का कर्ज! जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून आवाहन

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वः उत्पन्न वाढवण्याच्यादृष्टीने ५० लाखांपर्यंतचे कर्ज वाटप करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायत विभागाकडे २७ कोटींचा निधी शिल्लक असून इच्छुक ग्रामपंचायतींना यातून उत्पन्न मिळविणारी विकास कामे करता येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कर्ज घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

दरवर्षी प्रत्येकग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून दरवर्षी ०.२५ टक्के रकमेची कपात केली जाते. हा निधी जिल्हा ग्रामविकास निधी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे दरवर्षी जमा होते. गेल्या काही वर्षांत हा निधी २७ कोटींपर्यंत शिल्लक आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ग्रामपंचायतींना त्यांची आर्थिक क्षमता पाहून जिल्हा ग्रामविकास निधीतून पाच टक्के व्याजदराने दहा वर्षांसाठी कर्ज दिले जाते. मुद्दल आणि व्याज मिळून वर्षातून एकदा परतफेड करायची असते.

हे हि वाचा : महाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू!

पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार हे कर्ज देण्यात येते. या कर्जातून ग्रामपंचायतींना मार्केट बांधकाम (गाळे), बाजार ओटे बांधकाम, ग्रामपंचायत इमारत, कोंडवाडे आदी विविध विकास कामे करता येतात. गाळ्यांतून भाडेरूपाने स्वः उत्पन्नही वाढण्यास मदत होते. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या किंवा महामार्गालगत असलेल्या ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने ५ टक्के व्याजदराचे हे कर्ज परवडणारे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून या कर्जाबाबत विचारणा होत आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे २७ कोटींचा जिल्हा ग्राम विकास निधी पडून आहे. ग्रामपंचायतींनी मागणी केल्यास तातडीने हे कर्ज ग्रामपंचायतींना मिळू शकते. ठराव करून ग्रामपंचायत हा परिपूर्ण कर्जाचा प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाकडे पाठवू शकतात. व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर बँकांचे व्याजदर जास्त आहे. त्यामुळे ५ टक्के दराचे हे कर्ज ग्रामपंचायतींना सुलभ उपलब्ध होत आहे. जास्तीत जास्त ५० लाखांपर्यंत हे कर्ज मिळू शकते. यात २५ टक्के स्वनिधी ग्रामपंचायतींना खर्च करावा लागेल, असे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

हे हि वाचा : २७ भाविकांना जलसमाधी ; जळगाव जिल्ह्यावर शोककळा

६२ ग्रामपंचायातींना कर्ज

जिल्ह्यात १ हजार ३२३ ग्रामपंचायती असून आतापर्यंत त्यातील ६२ ग्रामपंचायतींना ग्रामविकास निधीतून कर्जवाटप करण्यात आलेले आहे. इतरही काही प्रस्ताव येण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने ग्रामपंचायत विभागाने विस्तार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्हा ग्रामविकास निधीचा उपयोग ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणासाठी होणे गरजेचे आहे. या कर्जातून ग्रामपंचायतींचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील शिवाय गावस्तरावर काही कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. – दादाभाऊ गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

- Advertisment -

ताज्या बातम्या