मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यात निर्माण झालेल्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने गुजरातच्या दूध उद्योगांना साद घातली आहे. अतिरिक्त दूधाची समस्या निकाली काढण्यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्त २० लाख लिटर दूधाचे संकलन करावे, असे आवाहन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. या प्रक्रिया केंद्रानी सहकार्य केल्यास राज्यातील दूध उत्पादकांना ३५ रुपये भाव देणे शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्य सरकारने दुधाच्या दरासंदर्भात घेतलेला निर्णय राज्यात तातडीने लागू करता यावा यासाठी विखे पाटील यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. बाहेरच्या राज्यात जाणाऱ्या दुधाला सुद्धा राज्य सरकारने लागू केलेले दर मिळावेत, यासाठी विखे पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच सह्याद्री अतिथीगृहात दूध व्यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्राच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीला अमूल, पंचमहाल, युनियन, कैरा युनियन, वलसाड, सुमूल आणि भरुज येथील युनियनचे प्रतिनिधी यांच्यासह दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड उपस्थित होते.
या बैठकीत विखे पाटील यांनी सर्व प्रतिनिधींशी संवाद साधताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने ठरवून दिलेला ३५ रुपयांचा दर लागू करावा, असे आवाहन केले. दर लागू करण्यासाठी काही अडचणी असल्यास विभागाकडून सोडविण्यासाठी निश्चित पुढाकार घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्याप्रमाणे राज्यातील प्रक्रीया केंद्राना दूध पावडर उत्पादनासाठी दिले जाणारे अनुदान परराज्यातील प्रक्रिया केंद्रानाही मिळावे, अशी मागणी उपस्थित प्रतिनिधींनी बैठकीत केली. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.
सद्य परिस्थितीत राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी प्रक्रिया केंद्रानी सहकार्य करावे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न मार्गी लागेल तसेच यामुळे होणारे आर्थिक नुकसानही टळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच विखे पाटील यांनी दुधाला हमीभाव मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची आपण व्यक्तिगत भेट घेवून याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती करणार असल्याची माहिती दिली.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार आतिशय संवेदनशील असून दुधाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, असेच प्रयत्न केले जात आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्व पातळीवर उपाय योजना करण्याचे काम सुरु असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.