Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात नवीन आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

राज्यात नवीन आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्यात अंबरनाथसह गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती आणि भंडारा येथील आठ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने परवानगी दिल्यामुळे या आठ महाविद्यालयत एकूण ८०० विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी प्रवेश मिळणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. या आठ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३३ वर पोहचली आहे. यामुळे वर्षाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४ हजार ८५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी विविध देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात होते. आता राज्यातच विद्यार्थी संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांना राज्यात शिक्षण घेणे शक्य होणार आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळे वर्षभरात एकूण १० वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळाली. या १० महाविद्यालयांच्या बांधकामासाठी आण इतर आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रत्येक महाविद्यालयास ४०३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होण्यासाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रममार्फत १० महाविद्यालयांची बांधकाम निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच बांधकामे सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या