Saturday, July 27, 2024
Homeनाशिकमनपाच्या महासभेत 'या' कामांना मंजुरी

मनपाच्या महासभेत ‘या’ कामांना मंजुरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेत ( NMC ) 15 मार्च 2022 पासून प्रशासक राजवट सुरू आहे. 2017 च्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासक राजवट सुरू झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, दर महिन्याच्या 20 तारखेपूर्वी महासभा घेणे अनिवार्य असल्यामुळे तसेच महापालिका अधिनियम 452 (अ) च्या तरतुदीनुसार आयुक्त तथा प्रशासकांना महासभा व स्थायी समितीची सभा घेण्याचे अधिकार असल्यामुळे नाशिक महापालिकेत आयुक्त महासभा घेत आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar)यांनी महासभासह स्थायी समिती सभा घेऊन विषय पत्रिकेवरील सर्व कामांना मंजुरी दिली.

एकुण सुमारे 11 कोटी रुपयांच्या विवीध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नगरसचिव राजू कुटे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, प्रशासन उपयुक्त मनोज घोडे-पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.

महासभेत पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक सहामधील मोरे मळा व हनुमान वाडी येथील जलकुंभ भरण्याकामी नव्याने उर्ध्ववाहिनी टाकण्याचे तसेच हनुमान वाडी जवळ रामनगर, कृष्णनगर, तुळजाभवानी नगर व परिसरातील मुख्य वितरण वाहिनी टाकण्यासाठी चार कोटी 68 लाख 98 हजार 876 रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक 15 मधील पखाल रोड आनंद लॉन्ड्री ते द्वारका जलकुंभ पर्यंत 500 मी व्यासाची गुरुत्ववाहिनी टाकण्यासाठी दोन कोटी 90 लाख 54 हजार 493 रुपयाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक 21 मधील जाचक मळा व वास्तु पार परिसरातील पाईप लागण्यासाठी 28 लाख 95 हजार 140 रुपयाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

महासभेचे कामकाज संपल्यानंतर स्थायी समितीची बैठक झाली. यामध्ये मनपाच्या विविध विभागासाठी राज्य सुरक्षा महामंडळाच्या कार्यरत सुरक्षा रक्षकांना दहा महिने कालावधीसाठी मुदत वाढ देण्यात आली. त्यासाठी एक कोटी 28 लाख 62 हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.त्याचप्रमाणे ज्यादा विषयांमध्ये प्रभाग क्रमांक 23 मधील ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 36 लाख 3 हजार 307 रुपये प्रभाग सत्तावीसमधील जुन्या मलवाहिका लाईन बदलणे व चेंबरची दुरुस्ती करण्यासाठी 45 लाख 57 हजार सहाशे दोन रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 24 मधील मलवाहीका लाईन बदलण्यासाठी 45 लाख 58 हजार 398 रुपये तर यशवंतराव चव्हाण तारांगण व विज्ञान केंद्र चालू करण्यासाठी चार लाख पंच्याऐंशी हजार एक रुपयाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

प्रशासकांनी घेतल्या 13 सभा

मागच्या महिन्यातच रुजू झालेले महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार त्यांच्या कारकीर्दीतली आजची दुसरी महासभा व स्थायी समितीची सभा होती. आतापर्यंत प्रशासकीय कारकीर्दीत एकूण 13 महासभा व 13 स्थायी समितीच्या बैठका झाल्या आहेत. यापूर्वीच्या आयुक्तांनी कामांना थेट मंजुरी दिली होती, मात्र आताचे आयुक्त अधिकार्‍यांना बोलवून सभा घेऊन कामाला मंजुरी देतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या